बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: March 17, 2024 03:03 PM2024-03-17T15:03:01+5:302024-03-17T15:03:27+5:30
बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत
पुणे: अनधिकृत मार्गाने बँकेची माहिती चोरी करून तसेच बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात शणैवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेमध्ये, धनकवडी परिसरात राहणाऱ्या गौतम प्रदीप बडवे (३५) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात नसल्याने अतिरिक्त दंड भरावा लागेल सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्डवरील दंड भरण्यासाठी तगादा लावून तक्रारदार यांना एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे रिमोट ऍक्सेस मिळवून, बँक खात्याची खासगी माहिती चोरून तक्रारदार यांच्या बँक खात्यातून तब्बल २८ लाख २७ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जबाब नोंदवला.
दुसऱ्या घटनेमध्ये, वाघोली परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेकडून त्यांच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स घेतले. त्यानंतर एक लिंक पाठवून महिलेला त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या क्रेडिट कार्डवरून २ लाख ५० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. रुपये उकलण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची गोपनीय माहिती अनधिकृत मार्गाने मिळवून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.