यवतमधून एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरीला ;३० लाख रुपयांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:57 AM2019-06-22T11:57:34+5:302019-06-22T11:58:35+5:30
खोलीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरांनी स्प्रे मारल्याने सदर कॅमेऱ्यामध्ये चोरटे येऊ शकले नाहीत...
यवत: यवत येथील पुणे सोलापूर महामार्गच्या लगत असणारे एसबीआय बँकेचे एटीएम शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले असल्याची घटना घडली आहे.या प्रकारामुळे यवत परिसरात खळबळ उडाली आहे.एटीम मधून सुमारे ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.चोरट्यांनी एटीएम सेंटर मधील संपूर्ण मशीनच लंपास केली असल्याने दरोडेखोरांची मोठी टोळी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली आहे व तपास चालू केला.एटीएम मशीनच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे फुटेज मिळाले आहे. मात्र, खोलीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरांनी स्प्रे मारल्याने सदर कॅमेऱ्यामध्ये चोरटे येऊ शकले नाहीत.
चोरीची घटना यवत पोलीस स्टेशन पासून जवळच घडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.एक वाजण्याच्या सुमारास चोरांनी एटीएम मशीन गाडीला बांधून बाहेर ओढून काढले त्यानंतर सेवा रस्त्यावरून काही अंतर मशीन ओढत नेऊन नंतर मशीन गाडीत भरून चोरांनी मशीन सह पोबारा केला. संबंधित घटनेची फिर्याद यवत पोलिसांत देण्याचे काम सकाळी सुरू होते.