क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३० लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: October 12, 2023 02:53 PM2023-10-12T14:53:25+5:302023-10-12T14:53:40+5:30
चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार
पुणे : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बुधवारी (दि. ११) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्ती याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ जुलै २०२३ ते ११ ऑकटोबर २०२३ दरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना एरिन आणि रिकी नावाच्या व्यक्तींनी व्हॅट्सऍपवर मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण ३० लाख ८७ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एरिन आणि रिकी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील करत आहेत.