लोकन्यायालयात ३० हजार दावे निकाली : पी. आर. अष्टुरकर; २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:59 PM2018-02-13T12:59:52+5:302018-02-13T13:03:08+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले.
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. त्यात २८ हजार ३३४ दावे दाखलपूर्व असून, उर्वरित २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित दाव्यांची आहेत. या प्रकरणांमध्ये १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती विधी सेवाचे सदस्य सचिव पी. आर. अष्टुरकर यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात तडजोडयोग्य फौजदारी, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, बँकेच्या वसुली केसेस, कामगार वाद, वीज बिल, पाणीपट्टी, वैवाहिक वाद, जमिनिचे वाद, सेवासंबंधी आणि महसूलविषयक असे एकूण ६८ हजार ७५३ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ५५ हजार ५०९ दाखलपूर्व आणि १३ हजार २४४ प्रलंबित दावे होते. त्यापैकी ३० हजार ४१५ दावे निकाली काढण्यात आले आहे.
दाखलपूर्व दाव्यामध्ये १० कोटी, १३ लाख, २७ हजार, २६४ आणि प्रलंबित दाव्यामध्ये ८ कोटी, २८ लाख, ३० हजार, २०० अशी एकुण १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई दिल्याची माहिती अष्टुरकर यांनी दिली.