आरटीईचे ३० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 21, 2017 05:42 AM2017-03-21T05:42:10+5:302017-03-21T05:42:10+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर आॅनलाईन पद्धतीने राबविल्या जात असलेल्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर आॅनलाईन पद्धतीने राबविल्या जात असलेल्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत केवळ ६ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेशास पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६९३ जागांसाठी ३६ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. मात्र, त्यातील केवळ ६ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्या फेरीतून प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्याप काही शाळांनी संकेतस्थळावर नोंदवली नाही. या शाळांची माहिती नोंदवून झाल्यानंतर पुढील फेरी जाहीर केली जाणार आहे.
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या ३६ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे ३० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या फेरीतून ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला. मात्र, काही कारणास्तव शाळेने प्रवेश दिला नाही. त्यांनी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. मात्र, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.