अबब ! एकाच दिवशी तीस हजार पर्यटकांनी दिली सिंहगडाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 19:44 IST2020-01-28T19:22:46+5:302020-01-28T19:44:21+5:30
तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालिची वाढ झाली आहे.

अबब ! एकाच दिवशी तीस हजार पर्यटकांनी दिली सिंहगडाला भेट
पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शाैर्य गाथेवर आधारलेला 'तान्हाजी' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. प्रजासत्ताकदिनी तब्बल 30 हजार पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली. सकाळी 10 वाजताच गडावरील पार्किंग फुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
पुणेकर आणि देशभरातील पर्यटकांसाठी सिंहगड नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विकेंडला सिंहगडावर गर्दी हाेत असते. अनेकदा घाटात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी देखील हाेत असते. नुकताच अजय देवगण यांची प्रमुख भुमिका असलेला 'तान्हाजी' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सिंहगडची लढाई आणि तानाजी मालुसरे यांची शाैर्यगाथा दाखविण्यात आली आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगड पाहण्याचे तसेच ज्या ठिकाणावरुन तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावरुन चढाई केली हाेती ताे कडा पाहण्याची माेठी उत्सुकता पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आता सिंहगडावर वळत आहेत.
प्रजासत्ताकदिनी राज्यातून तसेच देशभरातून हजाराे पर्यटकांनी सिंहगडला भेट दिली. या एकाच दिवसात तब्बल तीस हजाराहून अधिक पर्यटक सिंहगडावर आले हाेते. सकाळी 10 वाजताच सिंहगडावरील पार्किंग फुल झाले हाेते. संपूर्ण सिंहगड घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. दिवसभर पर्यटकांची गर्दी सिंहगडावर हाेती. वाहनांची संख्या माेठ्याप्रमाणावर वाढल्याने वनपाल बाळासाहेब जिवडे यांनी काेंडी साेडविण्यासाठी उपद्रवशुल्क नाक्यावर वाहतूक थांबवून ठेवत टप्प्याटप्याने वाहने गडावर साेडली.
पर्यटकांनी तानाजी मालुसरे जाे 'द्राेणगिरीचा कडा' चढून सिंहगडावर आले त्या कड्याची माहिती घेतली. तसेच त्यांच्या समाधी स्थळी नतमस्तक हाेऊन त्यांना मानाचा मुजरा देखील केला. पर्यटकांमध्ये सिंहगडची लढाई हाच चर्चेचा विषय हाेता. कोळीवाड्यातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी होउन गनिमी काव्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह आमावसेच्या काळोखात गड चढले हाेते. तो कोळीवाडा देखील पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता होती.