Video: पुण्याच्या वानवडीत रात्री टोळक्याकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड; नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:30 PM2023-03-26T14:30:57+5:302023-03-26T14:55:16+5:30
अज्ञाताने जवळपास 30 ते 40 वाहनांच्या काचा फोडल्या असून घरांवर देखील दगड मारले
वानवडी : वानवडी गावात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वानवडी गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच ही घटना कोयता गँगने केली आहे की कोणा माथेफेरु व्यक्तिने केली हे समजू न शकल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वानवडी गावातील खालची आळी, वरची आळी तसेच पालीकेच्या शिवरकर दवाखाना परिसरात रात्री अज्ञात व्यक्तिंनी दुचाकी, तीनचाकी, चारचारकी अशा जवळपास ३० ते ४० वाहनांच्या काचा फोडून दगड मारत तोडफोड केलेली आहे. तसेच घरांवर देखील दगड मारले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीत वाहनांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलीसांनी पहाणी केली असून तेथे असलेल्या एका सीसीटीव्ही कँमेरात सर्व घटना कैद झाली आहे. या घटनेमागे ४ ते ५ व्यक्ती असल्याचे या कॅमेरात दिसून येत आहेत. यामधील संशयित व्यक्तीची ओळख पटली असून पियुष मुरुटे (वय २२) असे त्याचे नाव आहे. गुन्हेगारांचा शोध वानवडी पोलीस घेत असल्याचे वानवडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सांगितले. गावात खालच्या आळीला रात्री, अपरात्री अवैधपणे सुरु असलेल्या धंद्यामुळे गावठाणातील रस्त्यांवर मद्यपींचे वाढते प्रमाण, जुगार, टवाळखोरांमुळे परिस्थिती बोकाळली आहे. महिला, लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यातूनच अज्ञात व्यक्तिंनी दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची घटना केल्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीसांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींना अटक करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरीक करत आहेत.
पुण्यात रात्री अज्ञाताकडून 30 ते 40 वाहनांची तोडफोड #punepolice#car#bikepic.twitter.com/GpNucCbkAQ
— Lokmat (@lokmat) March 26, 2023
डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी महिलांनी एकत्र येत गुन्हेगारी ला आळा घालण्यासाठी व सीसीटीव्ही कँमेरे बसवण्यासंदर्भातील निवेदन संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानंतर तीनच महिन्यात हि दुसरी मोठी घटना आहे. परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय गावालगत आहे. अवैध धंदे असलेल्या या गावात पोलीस कारवाईसाठी येत असतात तरीही असे प्रकार होत असल्याने नागरीक संशय व्यक्त करून नाराजी व्यक्त करत आहे.