विवाहाच्या आमिषाने ३० वर्षीय तरुणी बलात्कार; लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:44 AM2024-04-25T11:44:19+5:302024-04-25T11:44:46+5:30
३० वर्षीय तरुणीने याबाबत हरियाणा पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा पुणे पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे...
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याच्या आई व नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय तरुणीने याबाबत हरियाणा पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा पुणे पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी मेजर परिमलकुमार (रा. प्रिन्स ऑफ वेल्स रोड, वानवडी) याच्यासह आई आणि एका नातेवाइकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी मूळची हरयाणातील आहे. तिने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. विवाहविषयक संकेतस्थळावरील माहिती वाचून मेजर परिमलकुमार याच्या आईने तरुणीशी संपर्क साधला आणि विवाहाबाबत विचारणा केली. मुलगा परिमलकुमार लष्करात मेजर असून, पुण्यात नियुक्तीस असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर परिमलकुमार यांची आई आणि नातेवाईक हरियाणात मुलीच्या घरी गेले. तिच्या कुटुंबीयांशी विवाहाबाबत बोलणी केली. त्यानंतर तरुणी आणि परिमलकुमार यांच्यात संपर्क वाढला.
तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा सध्या सुटी नसल्याचे त्याने तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणी पुण्यात आली. तेव्हा घरी नातेवाईक आले आहेत, असे सांगून तरुणीची लष्कर भागातील एका तारांकित हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. परिमलकुमार याने तिच्याशी बळजबरी करून बलात्कार केला. तेव्हा आपण लवकरच विवाह करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीला खंडाळा परिसरात फिरायला नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा लवकरच दिल्लीत विवाह करू, अशी बतावणी केली.
त्यानंतर परिमलकुमार, त्याची आई, नातेवाइकांनी तरुणीशी संपर्क तोडला. तिने दूरध्वनी केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिला धमकावले. आमची दिल्लीतील मोठ्या नेत्यांशी ओळख आहे. आमच्याविरुद्ध तक्रार केली तर तुझे कुटुंबीय अडचणीत येतील, अशी धमकी दिली. यानंतर तरुणीने २३ एप्रिल रोजी हरियाणातील फरिदाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित गुन्हा लष्कर पोलिस ठाण्याकडे तपासासाठी सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनीषा वलसे करत आहेत.