३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

By admin | Published: June 10, 2015 04:53 AM2015-06-10T04:53:32+5:302015-06-10T04:53:32+5:30

खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

300 acres of tomatoes groundnut! | ३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

Next

खोडद : काल (सोमवारी) सायंकाळी ६च्या सुमारास खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मांजरवाडी परिसरात गारपीट व वादळामुळे सुमारे २५० एकर क्षेत्रातील, तर खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्रातील टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागा, डाळिंबांची झाडे उन्मळून पडली आहेत. जनावरांचा चारा, मका भुईसपाट झाला आहे. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने विद्युत ताराही तुटल्या आहेत, तर बाभळीसारखे कठीण झाडेसुद्धा उन्मळून पडली आहेत.
मांजरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हिवरे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. डाळिंब व टोमॅटोचे उत्पन्न घेण्याची वेळ तोंडाशी आली असताना वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकरी हताश झाला आहे.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील गहिना भोर यांच्या डाळिंबबागेतील सुमारे ५० डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर येथील संजय दशरथ भोर या शेतकऱ्याचा ४ एकर क्षेत्राचा टोमॅटोचा प्लॉटदेखील सलग भुईसपाट झाला आहे. मांजरवाडी येथील गायकवाडमळ्यातील सुमारे ७० एकर क्षेत्रातील टोमॅटो, मका, डाळिंब आदी पिकांची हानी झाली आहे.
टोमॅटोला गेल्या १० ते १५ वर्षांपासून चांगला बाजारभाव मिळत असल्याने या पिकाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अर्थ’ प्राप्त करून दिला असल्याने टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल दिवसेंदिवस वाढू लागला आहे. टोमॅटोला उत्पादनापर्यंत शेतकरी एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. सध्या टोमॅटोला २२० रुपये ते ३०० रुपये क्रेटला बाजारभाव मिळत आहे; मात्र सोमवारी झालेल्या गारपीट व वादळाचा प्रचंड मोठा तडाखा टोमॅटोला बसला आहे.
दरम्यान, जुन्नरचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी व जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी आज (मंगळावारी) सकाळी मांजरवाडी, खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मांजरवाडी परिसरातील शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: 300 acres of tomatoes groundnut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.