रॅलीसाठी ३०० अर्ज
By admin | Published: October 9, 2014 05:30 AM2014-10-09T05:30:15+5:302014-10-09T05:30:15+5:30
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले
पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रॅलींद्वारे तर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात गुंतले आहेत. यंदा पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदार संघातील रॅलीसाठी तब्बल तीनशे अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. आघाडी व महायुती तुटल्यामुळे ही संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यास बराच वेळ लागल्याने आणि त्यावर लक्ष ठेवून असलेल्या अन्य पक्षांकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर लागल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास कमी कालावधी मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त प्रचारासाठी उमेदवारांना रॅली काढण्यावरच भर दिल्याचे दिसून येते. राजकीय पक्षांना रॅली काढायची असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची व पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असते. चार विधानसभा मतदार संघामध्ये ३०० अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती मावळ, भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)