तीन महिन्यांत ज्येष्ठांच्या ३०० तक्रारी
By admin | Published: April 25, 2017 04:20 AM2017-04-25T04:20:07+5:302017-04-25T04:20:07+5:30
मुलगा-मुलगी सांभाळत नाही हो... नातेवाईक खूप त्रास देतात, मुलगा पेन्शन वापरू देत नाहीत यांसारख्या तक्रारींपासून ते एखाद्या
पुणे : मुलगा-मुलगी सांभाळत नाही हो... नातेवाईक खूप त्रास देतात, मुलगा पेन्शन वापरू देत नाहीत यांसारख्या तक्रारींपासून ते एखाद्या प्लंबरला पाठवाल का? डॉक्टरकडे घेऊन जायला कुणी नाही अशा अनेक तक्रारींचा पाऊस पोलीस आयुक्त कार्यालयात दररोज पडत असतो, तोही हेल्पलाईनवर! गेल्या तीन महिन्यांत ३०० पेक्षा अधिक तक्रारी पोलिसांकडे आल्या असून, अत्यंत संयमाने मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्या हाकेला साद घालण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून मंगळवारी ज्येष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे.
ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना जपले, तीच मुले त्यांच्या त्रासाचे कारण बनत आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून त्यांची छळवणूक करणे, त्यांना विनाकारण मानसिक त्रास देणे अशा प्रकारांनी ज्येष्ठांचे जगणं मुश्कील झाले आहे. पुणे हे पेन्शनरचे शहर म्हणून ओळखले जाते, मात्र याच पेन्शनर्सना घरच्यांकडून त्रास होत असल्याने नाईलाजास्तव पोलिसांकडे तक्रार करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात ३०० पेक्षा जास्त तक्रारी आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्यांचे पोलिसांकडून चांगलेच ‘सेशन’ घेतले जाते. समुपदेशनातून जे ऐकतात त्यांना सोडून दिले जाते. मात्र न ऐकणाऱ्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. ज्येष्ठांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष आहे. हेल्पलाईनचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिन्याला या हेल्पलाईनवर कॉलद्वारे येण्याचे प्रमाण हे १०० च्या आसपास असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.