PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:54 AM2024-03-08T10:54:48+5:302024-03-08T10:55:25+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गल्लीबोळातील कामे करण्यासाठी बजेटमध्ये जास्त निधी
पुणे: पुणे महापालिकेच्या २०२४-२५ अर्थसंकल्पात क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे, वॉर्डस्तरीय कामे आणि देखभाल-दुरुस्ती यांसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गल्लीबोळातील कामे करण्यासाठी बजेटमध्ये जास्त निधी दिला.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात मेट्रोचे नवीन रूट, ‘पीएमपीएमएल’साठी ५०० बस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या ‘मिसिंग लिंक’च्या कामासाठी मोठी तरतूद केली आहे. ‘जायका’अंतर्गत सुरू असलेली एसटीपी प्लांट उभारणी, नदीकाठ सुधार योजना ही कामेदेखील मार्गी लावण्यात येणार आहेत. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मितीचे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. वॉर्डस्तरीय कामासाठी ३४ कोटी, क्षेत्रीय कार्यालयाने करायची कामे यासाठी १२९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. क्षेत्रीय कार्यालयातील कामाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यावर भर
महापालिकेत भाजपची सत्ता असताना प्रस्तावित केलेले नदीसुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. सुरू असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला आहे.
सेवकवर्गावर ३ हजार ५५६ कोटींचा खर्च
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये भांडवली कामावर ५ हजार ०९३ रुपये खर्च दाखविला आहे; तर सेवकवर्गावरील खर्च ३ हजार ५५६ कोटी रुपये आहे. महापालिकेने नवीन केलेली भरती आणि समाविष्ट गावातील सेवकवर्गांमुळे हा खर्च वाढला आहे.