Pune: ३०० कोटींची फसवणूक, व्यावसायिकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: July 15, 2023 03:02 PM2023-07-15T15:02:00+5:302023-07-15T15:06:08+5:30
हा प्रकार १३ जुलै रोजी पहाटे पावणेचार वाजता घडला...
पुणे : लोकांच्या नावावर कर्ज काढून ३०० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी फसवणूक झालेल्या एका व्यावसायिकाने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अष्टविनायक फर्मच्या मालकासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभात शंभुप्रसाद रंजन (वय ४६, रा. विठ्ठलनगर, खराडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राजीव शंभुप्रसाद रंजन (वय ४८, रा. झारखंड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अष्टविनायक फर्मचे मालक सेल्वा नाडर, प्रसाद शिंदे, सचिनकुमार (रा. जगदेव पथ, पाटणा), अजिंक्य लोखंडे (रा. रिव्हेरिया सोसायटी, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जुलै रोजी पहाटे पावणेचार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे खराडी येथे पत्नी व २ मुलीसह रहात होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यावर फिर्यादी हे भावाच्या घरी गेले तेव्हा त्यांना ड्रॉव्हरमध्ये एक चिठ्ठी सापडली. अष्टविनायक फर्मचे मालक सेल्वा नाडर व प्रसाद शिंदे यांनी फर्ममध्ये गुंतविण्यास सांगून जुलै २०२१ मध्ये ९० लाख रुपयांचे कर्ज काढण्यास सांगितले. हे पैसे त्यांनी फर्ममध्ये गुंतविले. फेबुवारी २०२३ मध्ये नाडर याने कार्यालय बंद करुन पळून गेला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सचिनकुमार याने एस एस एंटरप्राईझेस कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळून देईन, असे सांगून त्यांच्या करुन १५ लाख रुपये घेऊन खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केली. रंजन यांची मर्सिडीज गाडी ही अजिंक्य लोखंडे याने ७ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केली. त्यातील ३ लाख रुपये देऊन उरलेले साडेचार लाख रुपये दिले नाही. तसेच सर्वांनी मिळून प्रभात रंजन यांची १ कोटी १७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे होणार्या त्रासाने त्यांनी राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. सेल्वा नाडर व इतरांनी शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. त्यातून फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल गाठले आहे.