Pune | आयटी तरुणांना ३०० कोटींचा गंडा घालून चोरटा पसार; एकाचवेळी घेतली तीन बँकांतून कर्ज
By विवेक भुसे | Published: March 18, 2023 01:12 PM2023-03-18T13:12:47+5:302023-03-18T13:13:03+5:30
सुमारे २०० लोकांना अंदाजे ३०० कोटी रुपयांचा गंडा घालून कंपनी संचालक ऑफिस बंद करुन पळून गेला...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात कर्ज थकल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना कर्ज टॉपअॅप करुन देतो, असे सांगून त्यांना एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन दिले. ते पैसे आपल्या कंपनीत गुंतविण्यास लावले. त्यानंतर सुमारे २०० लोकांना अंदाजे ३०० कोटी रुपयांचा गंडा घालून कंपनी संचालक ऑफिस बंद करुन पळून गेला आहे.
सेलवाकुमार नडार (रा. कुमार पृथ्वी अपार्टमेंट, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी लोहगावमधील एका ३८ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा पोलीस आयुक्तालयासमोरील न्युक्लेअस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंमध्ये ऑगस्ट २०२० ते नोव्हेबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलवा नडार याने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी सुरु केले. लॉकडाऊनच्या काळात कोणाकोणाची कर्ज थकली आहे. अशा आयटी क्षेत्रातील लोकांची माहिती डेटा व्हेंडरकडून प्राप्त केली. कार्यालयात कर्मचारी नेमून त्यांना संपर्क करण्यात आला. तुमचे कर्ज टॉपअॅप करुन देतो, असे त्याने सांगितले. तुमचे कर्ज मी घेतो. त्यासाठी त्यांच्याकडून आणखी ३ बँकांचे कर्जासाठी केवायसी घेतले. त्यांच्या नावावर एकावेळी तीन तीन बँकांकडून कर्ज काढले. ते काढताना त्यांचे जुने कर्ज फेडले. त्यामुळे त्यांचे सिबील क्लीन झाल्याने त्यांना कर्ज मिळणे सोयीचे झाले.
बँकांमधील त्रुटीचा घेतला गैरफायदा
बँकांचे कर्ज प्रकरण करताना एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतल्यानंतर त्याच्या सिबिलवर नोंद होण्यास एक आठवड्यापासून ४५ दिवसांपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे याने एकाच्या नावावर एकाचवेळी ३ बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे पैसे आपल्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवण्यास सांगितले. मुदत संपल्यानंतर त्यांना चांगला परतावा देण्याची हमी दिली. त्यांना कर्जाचा हप्ता भरण्यास दर महिन्याला तो हप्त्याची रक्कम देत होता. त्यामुळे कोणाला संशय आला नाही. नोव्हेंबर २०२२ पासून कर्जाच्या हप्त्याची रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ सुरु केली. लोकांना वेगवेगळी कारणे सांगून सध्या तुम्ही भरा मी देतो, असे सांगून लोकांना भुलावत राहिला. त्यानंतर त्याने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यालय बंद करुन पळून गेला. त्यानंतर हे गुंतवणुकदार कर्जदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.
फिर्यादी यांना पर्सनल लोन करुन घेऊन त्यांच्या खात्यावर जमा झालेले ४० लाख ८९ हजार १५२ रुपये त्यांच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवायला सांगितले. त्यानंतर अजून बजाज फायनान्सकडून १५ लाखांचे कर्ज मंजूर करुन घेऊन २०२२ पर्यंत कर्जाच्या हप्त्याची रक्कम फिर्यादीच्या खात्यावर पाठविली. जानेवारी २३ पासून थकीत कर्जाची रक्कम ३३ हजार ८५ हजार ८३१ रुपये हा हप्ता न भरता तसेच एसआयपीमध्ये गुंतवलेले २ लाख ८० हजार रुपये परत केले नाही. फिर्यादी यांचे गुंतवलेले ३६ लाख ६५ हजार ८३१ रुपये परत न केले नाही. तसेच त्यांच्याबरोबर आणखी १६ जणांचे मिळून ७ कोटी ९५ लाख ८४५ रुपयांची फसवणूक केली आहे. अशाच प्रकारे त्याने एकूण २०० कर्जदारांची अंदाजे ३०० कोटी रुपयांची फसवणूक करुन पसार झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर तपास करीत आहेत.
पगारापेक्षा कर्जाचा हप्ता अधिक
अनेकांच्या नावावर ३-३ बँकांमधून लाखोंची कर्ज घेऊन ते स्वत:च्या कंपनीत गुंतवायला नाडरने लावले. त्यात अनेकांच्या कर्जाचा हप्ता हा त्यांच्या पगारापेक्षा अधिक होता. ८० हजार रुपये पगार पण कर्जाचा हप्ता सव्वा लाख रुपये काही जणांबाबत होते. सुरुवातीला तो हप्त्याची रक्कम देत असल्याने या कर्जदारांना ते लक्षात आले नाही. आता त्याने हप्ता देणे बंद केल्यावर त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.