पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने
By नितीश गोवंडे | Updated: April 30, 2023 15:28 IST2023-04-30T15:26:52+5:302023-04-30T15:28:14+5:30
अकरा रेल्वेंच्या माध्यमातून वर्षभर ३५० रेल्वे धावणार असून, २५० पर्यटन व तीर्थस्थळांना प्रवाशांना भेटी देता येणार

पर्यटनातून रेल्वेला वर्षभरात तब्बल ३०० कोटी; IRCTC ने घेतल्या ११ रेल्वे भाड्याने
पुणे : रेल्वेकडून अनेकदा कोच उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. प्रवाशांचा मात्र ‘थीम’ पर्यटनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आयआरसीटीसी ने (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ११ रेल्वे भाड्याने घेतल्या आहेत. या ११ रेल्वेंच्या माध्यमातून वर्षभर ३५० रेल्वे धावणार असून, २५० पर्यटन व तीर्थस्थळांना प्रवाशांना भेटी देता येणार आहेत. आयआरसीटीसी ने यासाठी अभ्यासपूर्वक काही स्थळांची निश्चिती केली आहे.
याआधी कधी दिव्य काशी एक्स्प्रेस, रामायण एक्स्प्रेस तर कधी अभयारण्य दर्शन घडवणारी एखादी रेल्वे धावत होती. मात्र प्रवाशांना हा आनंद वर्षभर घेता यावा, म्हणून ‘आयआरसीटीसी’ ने हा तोडगा काढला आहे.
काशीला सर्वात जास्त प्रतिसाद..
आयआरसीटीसी च्या वतीने देशातील व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ज्या पर्यटन विशेष रेल्वे धावतात, त्यात सर्वात जास्त प्रतिसाद काशीला जाणाऱ्या रेल्वेला मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘आयआरसीटीसी’ काशीसाठी आणखी विशेष रेल्वे सोडणार आहे. खास पर्यटनासाठी सुरू झालेल्या या रेल्वेतून वर्षाला ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.