शहरात गुन्हेगारीचे तब्बल ३०० हॉटस्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 10:15 PM2018-10-03T22:15:22+5:302018-10-03T22:22:40+5:30
शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉल्सचा तांत्रिक अभ्यास व त्याचे विश्लेषण करुन शहरात जेथे जास्त गुन्हेगारी घटना घडतात, असे ३१० ठिकाणे हॉट स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत़.
पुणे : शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉल्सचा तांत्रिक अभ्यास व त्याचे विश्लेषण करुन शहरात जेथे जास्त गुन्हेगारी घटना घडतात, असे ३१० ठिकाणे हॉट स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत़. या कॉल्सची वर्गवारी करुन त्याद्वारे गुन्हेगारी रोखण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचे अस्तित्व जास्तीत जास्त कसे राहिल हे निश्चित करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी सांगितले़.
पोलीस नियंत्रण कक्ष हा पोलिसांचा डोळा असतो़. शहरात घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी तसेच माहिती देण्यासाठी नागरिक नियंत्रण कक्षाला फोन करत असतात़. या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या कॉल्सचा या यंत्रणेमार्फत डाटा बेस तयार करण्यात येत आहे़. त्याद्वारे माहितीच आणखी शास्त्रीय आणि अचूक विश्लेषण करण्यात येणार आहे़. कॉल्स येणारे शहरातील ठिकाण, वेळ आणि गुन्ह्याचा प्रकार आदींबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे़. सध्या मागील तीन महिन्यांमध्ये नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉल्सची माहिती संकलित करण्यात आली़. त्यातून अधिकाधिक कॉल्स येणारी ३१० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे़. या माहितीनुसार आता पुढील टप्प्यात शारिरीक हल्ले, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा विविध गुन्ह्याचे प्रकार कोणत्या भागात कधी झाले याचे विश्लेषण केले जाणार आहे़. त्यानंतर मालमत्ता विषयक गुन्हे, वाहनचोरी विषयक गुन्हे आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे़. ही माहिती संकलित झाली की त्यावरुन हे गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या भागात काय उपाययोजना आवश्यक आहे़. पोलिसांची गस्त व त्या परिसरातील उपस्थिती कशी वाढविता येईल, याचा विचार केला जाणार असल्याचे डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले़.
़़़़़़़़़़़़़
चारित्र्य पडताळणी आता ११ दिवसात
पासपोर्टसाठी केलेल्या जाणाऱ्या अर्जावर पोलिसांकडून केली जाणारी चारित्र्य पडताळणी आता ११ दिवसात पूर्ण केली जात आहे़. यापूर्वी हा कालावधी ३६ दिवस इतका होता़ सध्या केवळ ज्यांच्यावर वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत, अशांचे अर्ज प्रलंबित राहतात़ इतर अर्जांवरील पडताळणी ११ दिवसात पूर्ण होते, असे डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले़. .
़़़़़़़़़़़़़़
गौतम नवलाखा यांची नजरकैद वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात
बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या गौतम नवलाखा यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हाऊस अरेस्टमध्ये वाढ करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे़. सर्वोच्च न्यायालयाने या पाच जणांना न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्याचा वेळ दिला होता़. या कालावधीत पुणे पोलीस त्यांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलत असल्याचे पोलीस आयुक्त के़ व्यंकटेशम यांनी सांगितले़.
़़़़़़़़़
अनावश्यक कॉल्स करणाऱ्यांवर कारवाई
पोलीस नियंत्रण कक्षामध्ये येणाऱ्या अनावश्यक कॉल्सची संख्या कमी व्हावी, यासाठी आयव्हीआरएस प्रणाली सुरु केली आहे़. त्यामुळे कॉल्सचे प्रमाण ५ ते १० टक्के इतके घटले आहे़, असे असले तरी नियंत्रण कक्षाला विनाकारण कॉल करुन कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, अशा मानसिक रुग्णांना वगळून इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे़, असे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़.