बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 04:22 PM2024-05-18T16:22:03+5:302024-05-18T16:22:21+5:30

कारवाईमुळे प्रशासकीय भवनात काम करणाऱ्या इतर महसूल अधिकाऱ्यांचे मात्र,धाबे चांगलेच दणाणले

3,000 bribe accepted by private agent for Talatha of Baramati Caught red-handed in Talathi office | बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

सांगवी : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर मुलीची वारस नोंद करून घेण्यासाठी बारामतीच्या तलाठयासाठी तीन हजारांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या एका खाजगी एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीच्या प्रशासकीय भवन मधील तलाठी कार्यालयातच रंगेहाथ पकडून कारवाई केली आहॆ. या कारवाईमुळे प्रशासकीय भवनात काम करणाऱ्या इतर महसूल अधिकाऱ्यांचे मात्र,धाबे चांगलेच दणाणले आहेत. शुक्रवार (दि.१७) रोजी सकाळी पाउणे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहॆ. याबाबत चंद्रकांत परभत जावळकर याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ.

तक्रारदार माधव विठ्ठल शिंदे (वय ३४), धंदा मजुरी रा. जामदार रोड कसबा, (बारामती ता. बारामती जि. पुणे) यांनी ही तक्रार दिली आहॆ. शिंदे  यांचे सासरे मयत दिलीप पावार यांच्या नावावर असणारी बारामतीतील कसबा येथील जागेवर शिंदे यांच्या पत्नीची वारसाप्रमाणे वारस नोंद व्हावी यासाठी तलाठी कार्यालयाला अर्ज केला होता. वारस नोंद लावून घेण्यासाठी तलाठी यांना पाच हजार रुपये द्यावे लागतात म्हणून खाजगी एजंट चंद्रकांत जावळकर याने तक्रारदार शिंदे यांच्याकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत फिर्यादी माधव विठ्ठल शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली होती.

फिर्यादी यांची पत्नी सोनाली शिंदे यांचे मयत वडील दिलीप पावार यांच्या नावे असलेली कसबा, बारामती येथील जमीन गट. नं १३१/१ प्लॉट नं १० वरील नाव कमी करून वारसाप्रमाणे सोनाली शिंदे यांची जमीनीवर वारस नोंद करून घेण्यासाठी बारामती तलाठी यांच्या करीता चंद्रकांत परभत जावळकर याने पाच हजारांच्या लाचेची मागणी करून ४ हजार लाच मागितली. तडजोडी नंतर ४ हजारांवरुन ३ हजार रुपये देण्याचे ठरले. व अखेर ३ हजार लाचेची रक्कम स्वीकारताना चंद्रकांत परभत जावळकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याबाबत पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 3,000 bribe accepted by private agent for Talatha of Baramati Caught red-handed in Talathi office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.