Anti Corruption Bureau: पाणी कनेक्शन देण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच; एसीबीने कंत्राटदाराला रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:07 PM2022-03-29T20:07:56+5:302022-03-29T20:08:09+5:30
एका नागरिकाकडून १५ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी १७ हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका कंत्राटदाराला रंगेहाथ पकडले.
पुणे : शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने आंदोलन होत असतानाच पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका नागरिकाकडून १५ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी १७ हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका कंत्राटदाराला रंगेहाथ पकडले. महेश तानाजी शिंदे (वय ४६) असे या कंत्राटदाराचे नाव आहे.
एस. एन. डी. टी येथील पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणाऱ्या डेक्कन जिमखाना, प्रभात रोड, गोखलेनगर, सेनापती बापट रोड या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने गेले काही दिवस येथील नागरिकांची ओरड होती. सर्व पक्षातील लोकांनी यावर आंदोलन केले. खासदार गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन तेथील पाण्याचे प्रेशर तपासले. असे असतानाच प्रत्यक्षात महापालिकेचे कंत्राटदार नागरिकांना लाच घेऊन पाण्याचे कनेक्शन देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत ५४ वर्षाच्या नागरिकाने लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकतींमध्ये पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी चतु:श्रृंगी पाणी पुरवठा विभागात अर्ज केला होता. त्यांना पाणी कनेक्शन मिळवून देण्यासाठी महेश शिंदे यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १५ हजार रुपये त्याने सुरुवातीला घेतले होते. यानंतर उर्वरित १५ हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची २८ मार्च रोजी पडताळणी केली असता महेश शिंदे याने सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना पैसे द्यावे लागतात, असे म्हणून त्यासाठी १५ हजार रुपये व प्लंबरसाठी २ हजार रुपये असे १७ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी एस एन डी टी पाणी पुरवठा विभागाच्या कर्वे रोड येथील कार्यालयासमोर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १७ हजार रुपये स्वीकारताना महेश शिंदे याला पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता संगोलकर, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार अयाचित, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर यांच्या पथकाने केली.