३०८ अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज, पाणी देण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:32 PM2019-02-19T23:32:33+5:302019-02-19T23:33:06+5:30
ग्रामीण भागातील अंगणवाड्या स्वयंपूर्ण : शहरातील अंगणवाडी अद्याप दुर्लक्षितच
बारामती : बारामतीच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असताना शहरातील अंगणवाड्या मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत. तालुक्यातील ३२३ स्वतंत्र इमारतींपैकी ३०८ इमारतींना वीजजोड व नळजोड देण्यात प्रशासनास यश आले आहे. बारामती तालुक्यात ४१७ अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी प्रकल्प एकमध्ये २५३ तर प्रकल्प दोनमध्ये १६४ केंद्रांचा समावेश होतो.
प्रकल्प एकमध्ये १८८ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १८२ अंगणवाडी केंद्रे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. तर प्रकल्प दोन मध्ये १३५ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १२६ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर प्रकल्प एकमधील १८८ अंगणवाडी केंद्र व प्रकल्प दोन मधील १२४ अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले आहेत. विजेच्या खांबाअभावी १५ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात अडचण येत आहे. तर ५ अंगणवाडी केंद्राच्या वीज व नळजोडची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र हद्दवाडीनंतर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत एकूण २२ अंगणवाड्या आल्या आहेत. यापैकी प्रकल्प एकमध्ये माळेगाव, सातववस्ती, बोरावकेवस्ती, ढवाणवस्ती, तर प्रकल्प दोनमध्ये जळोची गावठाण, औद्योगिक वसाहत, मलगुंडेवस्ती, सूर्यनगरी आदी अंगणवाडी केंद्रांना तात्पुरत्या इमारतींची सोय आहे. मात्र शहरातील या अंगणवाड्यांमध्ये सोयी पुरवताना बालविकास प्रकल्प विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शहराच्या दृष्टीने अविकसित असणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होत असताना बारामती नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे २२ अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. शहरातील सर्वसामान्यांची हजारो बालके या अंगणवाड्यांमधून शिक्षणाची सुरुवात करत आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनदेखील शहर हद्दीतील अंगणवाडी केंद्रांची दखल घेतली जात नाही.
च्बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दुष्काळाचा परिणाम अंगणवाडी केंद्रावर देखील झाला आहे. गाडीखेल, साबळेवाडी, भिलारवाडी, सोनवडी सुपे काळेवाडी, कारखेल आदी गावांमध्ये पाणी योजनाच नसल्याने येथील अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले नसल्याचे, बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यातील स्वतंत्र इमारती असणाºया अंगणवाडी केंद्रांना वीज व नळजोड देण्यात यश आले आहे. काही ठिकाणी किरकोळ अडचणींमुळे वीज व पाणी देण्यात अडचणी आल्या आहेत. मात्र शहरात या सर्व सोयी अंणवाडी केंद्रांना देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.
- मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी
बारामती पंचायत समिती