नालेसफाईसाठी ३१ मे डेडलाइन
By Admin | Published: May 13, 2017 04:54 AM2017-05-13T04:54:14+5:302017-05-13T04:54:14+5:30
पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून शहरातील सर्व नालेसफाई व दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश महापौर मुक्त टिळक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून शहरातील सर्व नालेसफाई व दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश महापौर मुक्त टिळक यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते, अशी सुमारे १२५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. अशा ठिकाणी पावसाळी गटारांचे काम देखील पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची डेडलाइन देण्यात आली असल्याचे मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन व आढाव घेण्यासाठी टिळक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, मे महिन्यात नालेसफाई व पावसाळी गटारांची सफाई करण्यात येते. पावसाचे पाणी रस्त्यावर न साठता विनाअडथळा वाहून जावे या उद्देशाने ही कामे केली जातात. यंदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते, अशी सुमारे १२५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नाले सफाई व दुरुस्ती कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा झालेल्या कामांचा आढाव घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.
नदीला पूर आल्यानंतर अनेक कुटुंबं सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. यासाठी पूर्व तयारी म्हणून ब्ल्यू लाईनच्या आत येणाऱ्या सर्व इमारती व घरांची माहिती घेऊन किती कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल, त्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, याची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.