चोरट्याकडून ३१ मोबाईल जप्त, गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:33 AM2018-02-26T05:33:23+5:302018-02-26T05:33:23+5:30
गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केलेल्या चोरट्याकडून २ लाख ९६ हजार ६०० रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातून मोबाईल शिताफीने चोरण्यात येत होता.
पुणे : गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केलेल्या चोरट्याकडून २ लाख ९६ हजार ६०० रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातून मोबाईल शिताफीने चोरण्यात येत होता.
अवेज परवेझ शेख (वय, १९, रा. संजीवनी हॉस्पिटलजवळ, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक संदीप तळेकर यांना शेख चोरीचे मोबाईल विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला स्वारगेट एसटी स्थानकावरून अटक केले. त्याच्याकडून ६ मोबाईल मिळून आले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत अणखी २५ मोबाईल त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
स्वारगेट एसटी स्थानक, शिवाजीनगर आणि गाडीतळ, हडपसर येथून बसमध्ये चढणाºया प्रवाशांचे मोबाईल शेखने चोरले आहेत. त्याने चोरलेल्या मोबाईलपैकी हडपसर पोलीस ठाण्यात ४, शिवाजीनगर आणि स्वारगेट येथे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. उर्वरित २५ मोबाईल मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले असल्यास त्यांनी रेंजहिल्स रस्त्यावरील गुन्हे शाखा युनिट तीनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात शेख याने हे मोबाईल चोरले आहेत. त्याला व्हाईटनरचे व्यसन असून, तो सध्या काही काम-धंदा करीत नाही. या पूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल नसल्याचे डहाणे म्हणाले.