पटसंख्येअभावी ३१ शाळा बंद!
By admin | Published: September 2, 2016 05:39 AM2016-09-02T05:39:41+5:302016-09-02T05:39:41+5:30
कृतियुक्त ज्ञानरचनावादचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश आले
- बापू बैैलकर, पुणे
कृतियुक्त ज्ञानरचनावादचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश आले असले, तरी पटसंख्या शून्य झाल्याने ३१ शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.
२०१० पासून पटसंख्या गळती ही जिल्हा परिषद शाळांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे दर वर्षी मोठी गळती होत आहे. २०१२-१३ या वर्षांत पुणे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २०१३-१४मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३० इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २०१४-१५मध्ये ३ लाख ३४ हजार ५६० इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. गेल्या वर्षी २०१५-१६मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात त्यांना यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ही गळीत रोखून धरण्यासाठी काही दिवसांपासून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला. यात आयएसओ शाळा हा उपक्रम व शासनाच्या सूचनेनुसार ज्ञानरचनावादाचे धडे यामुळे गळीत रोखून धरण्यात येऊन गेल्या वर्षी २ लाख ३४ हजार २७० इतका असलेला पट या वर्षी ३० जुलैपर्र्यंत २ लाख ३४ हजार ८२६ इतका झाला असून, पट ५५६ने वाढला आहे.
हे कौतुकास्पद आहे; मात्र असे असले तरी कमी पटामुळे शाळा बंद होण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षी ३ हजार ७२४ जिल्हा परिषद शाळा होत्या.
डिसेंबरमध्ये शासनाने केलेल्या आॅनलाईन नोंदीत ० ते २० पटसंख्या असलेल्या ५८९ शाळा होत्या. या शाळांचे समायोजनचे आदेश तसल्याने अद्याप ते झाले नाही. पण, गेल्या वर्षीपासून ३१ शाळा कमी पटसंख्या असल्याने बंद केल्याचे शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.