‘एअरफोर्स’मध्ये देशातून ३१ जणांची निवड, त्यात पुण्याची आदिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:20+5:302021-08-22T04:14:20+5:30
पुणे : आदिती कटारे (वय २३) या तरुणीची भारतीय वायुदलातल्या तांत्रिक विभागासाठी निवड झाली आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स तुकडीच्या ...
पुणे : आदिती कटारे (वय २३) या तरुणीची भारतीय वायुदलातल्या तांत्रिक विभागासाठी निवड झाली आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स तुकडीच्या शॉर्ट सर्विस कमिशनसाठी देशभरातून ३१ जणांची निवड झाली आहे. यात आदिती यांचा समावेश आहे.
त्यांचे शालेय शिक्षण चिंचवडच्या कमलनयन बजाज स्कूलमध्ये झाले असून दहावीला तिला ८९.८२ टक्के गुण मिळाले होते. सन २०१९ मध्ये तिने ८० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेली दोन वर्षे ती बार्कले बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत आहे. लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांच्या ॲपेक्स संस्थेतून आदिती यांनी एस. एस. बी. मुलाखतीसाठीचे मार्गदर्शन घेतले. आदिती यांचे वडील कल्याण कटारे हे व्यावसायिक असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी खुल्या भागांचा पुरवठा करतात. आई मंजूषा गृहिणी आहेत.
आदिती यांनी सांगितले, “मुलाखतीवेळी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. ब्राह्मणकर सरांनी घेतलेल्या मुलाखतीच्या सरावाचा मला फायदा झाला. त्यांच्याकडील प्रशिक्षण आणि गटचर्चेमुळे मुद्दे सहजपणे मांडू शकले. माझ्या यशाचे श्रेय आई, बाबा आणि ब्राह्मणकर सरांना देईन. लहानपणी शाळेत असताना ऐकलेल्या कर्नल प्रकाश सुर्वे यांच्या व्याख्यानामुळे वायुदलात जाण्याची प्रेरणा मिळाली होती.”