पुणे शहरात ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु, त्यात १५८ दुचाकीस्वार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:34 PM2018-11-19T12:34:35+5:302018-11-19T12:50:27+5:30
गेल्या ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु झाला आहे़.त्यातील एखादा अपवाद वगळता कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते़.
विवेक भुसे
पुणे : वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे एका बाजूला वाहतूकीचा वेग कमी झाला असला तरी शहरातील अपघातांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली दिसून येत नाही़. गेल्या ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु झाला आहे़. २०१७ मध्ये शहरात झालेल्या प्राणघातक अपघातात ३७३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता़. या अपघातात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे प्रमाण ४० टक्के असून २०१८ मध्ये फक्त पुणे शहरात १५८ दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला आहे़.त्यातील एखादा अपवाद वगळता कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते़. या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले असते तर या अपघातातील अनेकांचे प्राण वाचले असते़. त्यामुळे या अपघातात घट व्हावी, यासाठी शहर पोलीस दलाने हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़.
१५ आॅगस्टपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने सुरु झाले़. त्याअगोदरचे पिंपरी चिंचवडमधील अपघात वगळता पुणे शहरात आतापर्यंत २९१ प्राणघातक अपघात झाले असून ३२४ गंभीर आणि १५४ किरकोळ अपघात झाले आहेत़.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील अपघात पाहता आतापर्यंत ४३१ गंभीर अपघात झाले असून त्यात ५१२ जण गंभीर जखमी झाले आहेत़ तर, २०६ किरकोळ अपघात झाले असून त्यात २६० जण किरकोळ जखमी आहेत़ शहरात आॅक्टोंबरअखेर एकूण १०३४ अपघात झाले आहेत़.
गेल्या वर्षी २०१७ मध्ये झालेल्या प्राणघातक अपघातात १९२ दुचाकीस्वारांना आपल्या प्राण गमवावा लागला होता़. तीनचाकीच्या अपघातात १६, मोटारींच्या अपघातात १०८, ट्रक ९६, बस ४८ आणि १५ पादचाऱ्यांचा मृत्यु झाला होता़.
शहराच्या मध्यवस्तीत अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे वाहनांचा वेग कमी असला तरी अनेक ठिकाणी मोठे सिमेंटचे रस्ते झाले आहेत़. यावरुन गर्दीच्या वेळ वगळता वाहने अतिवेगाने धावत असतात़. अशावेळी अपघात झाल्यावर त्यात हेल्मेट नसेल तर सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटले जाऊन त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होतो़. अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व येते़.
..............................
विना हेल्मेट दुचाकीस्वारांना २ कोटींचा दंड
शहरात आज सरसकट हेल्मेट सक्ती राबविली जात नसली तरी दुचाकी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास व तो विना हेल्मेट असेल तर त्याच्यावर हेल्मेटसक्तीनुसार दंडात्मक कारवाई केली जाते़. या वर्षी आॅक्टोबरअखेर अशा ३८ हजार ५० वाहनचालकांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत १ कोटी ९० लाख २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे़
याशिवाय वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणाऱ्या ४६ हजार ५० जणांवर कारवाई करुन त्यांच्या ९३ लाख १२ हजार रुपये दंड वसुल केला गेला आहे़.