बांधकाम विभाग उत्पन्नात ३१८ कोटींनी घट
By admin | Published: March 30, 2017 03:03 AM2017-03-30T03:03:51+5:302017-03-30T03:03:51+5:30
महापालिकेचे आगामी वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक आज (गुरुवार) सादर होणार असतानाच बांधकाम विभागाच्या उत्पन्नात
पुणे : महापालिकेचे आगामी वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक आज (गुरुवार) सादर होणार असतानाच बांधकाम विभागाच्या उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत ३१८ कोटी रुपयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम अंदाजपत्रकाची जुळवाजुळव करताना होणार असून पालिकेला तातडीने उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत.
महापालिकेकडून आगामी वर्षात २४ तास पाणीपुरवठा, मेट्रो, एचसीएमटीआर अशा हजारो कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचवेळी उत्पन्नामध्ये घट दिसत असल्याने उत्पन्नवाढीसाठी पालिकेला पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत. पालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये वाढ करण्यासाठी आयुक्तांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर काटकसरीच्या मार्गांचा अवलंब आगामी काळात पालिकेला करावा लागणार आहे.
बांधकाम विभागाच्या चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) उत्पन्नामध्ये ३१८ कोटींनी घट झाल्याचे दिसून आले आहे. बांधकाम विभागाला चालू वर्षी ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम परवानगी आणि प्रीमियमच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी बांधकाम विभागाला (२०१५-१६) मधे ७८८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. या तुलनेत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
मिळकत कर विभागाला या वर्षी ११३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी मिळकत कर विभागाला ११०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यांच्या उत्पन्नात आतापर्यंत २५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
राज्य शासनाने एलबीटी (स्थानिक संस्था कर) बंद केल्याने त्याबदल्यात पालिकेला अनुदान दिले जात आहे. एलबीटी हे अनुदान स्वरूपात मिळत असल्याने त्यापासून उत्पन्न वाढीची अपेक्षा करता येत नाही. आगामी वर्षापासून आता एलबीटी ऐवजी जीएसटी कर लागू होणार आहे.
आयुक्त आज स्थायीला सादर करणार अंदाजपत्रक
आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून आज (गुरुवार) दुपारी एक वाजता स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. प्रशासनाकडून दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाते. मात्र यंदा महापालिकेची निवडणूक असल्याने अंदाजपत्रक उशीरा सादर केले जात आहे. स्थायी समितीकडून आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुधारणा करून ते मुख्यसभेला सादर केले जाईल. मुख्यसभेच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रकाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल.
विकासकामांना फटका
महापालिकेचे अंदाजपत्रकाचा आकडा ५ हजार कोटी रुपयांचा दिसत असला तरी अधिकारी व सेवक वर्गाचा पगार, भांडवली खर्च, मोठ्या प्रकल्पांचा निधी वजा जाता नगरसेवकांकडून केल्या जाणाऱ्या सह यादीतील विकासकामांना ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होऊ शकत होता. आता बांधकाम विभागाच्या उत्पन्नातच ३१८ कोटींची घट झाल्याने अनेक विकासकामांना त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेला प्रमुख उत्पन्न स्रोतामध्ये एलबीटी, मिळकत कर, बांधकाम विकास शुल्क आदींचा समावेश होतो. महापालिकेच्यावतीने यंदा एकूण ५८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ हजार कोटी रुपयांचा पल्ला पालिकेला गाठता आला आहे. अपेक्षित धरलेल्या उत्पन्नापेक्षा १८०० कोटींची घट दिसून येत आहे. यामध्ये सर्वांत मोठी घट बांधकाम विभागाच्या उत्पन्नात झालेली दिसून येत आहे.