रक्तचंदनाचे लाकडासह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:11+5:302021-06-10T04:09:11+5:30
याप्रकरणी संजय साबळे (वय १९, रा. काळुबाई मंदिराजवळ, मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली), रोहित रवी रुद्राप ( वय २०, ...
याप्रकरणी संजय साबळे (वय १९, रा. काळुबाई मंदिराजवळ, मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली), रोहित रवी रुद्राप ( वय २०, रा. फ्लॅट नंबर १, रुबीकॉर्नर सोसायटी, शिवनेरीनगर, गल्ली नंबर २४, कोंढवा- पुणे ४८ ) व ॲलेन कन्हय्या वाघमारे ( वय २५, रा. भैरोबानाथ मंदिराजवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवार, ८ जून रोजी खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल पिलाने यांना रक्तचंदन लाकडाची तस्करी करून, ते विक्रीकरिता काही इसम लोणी काळभोर, हडपसर, पुणे या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) व पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) व सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे पुणे शहर ) यांनी दिलेल्या आदेशानुसार: पोलीस निरीक्षक विजय झंझाळ, श्रीकांत चव्हाण, सहायक फौजदार संपत अवचरे, पोलीस हवालदार प्रदीप शितोळे, साळुखे, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, भूषण शेलार, चेतन शिरोळकर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत आले.
पुणे-सोलापूर महामार्गावरील मधुबन लॉन्स येथे येथे सापळा रचून थांबल्यानंतर, काही वेळाने महिंद्रा पिकअप गाडी (क्रमांक एमएच २५ पी ४४१८) ही येताना दिसल्याने तिला अडवून ड्रायव्हर साबळे व त्याचे शेजारी बसलेल्या रुद्राप यांना ताब्यात घेऊन पाहणी केली असता गाडीमध्ये वेगवेगळ्या लांबीच्या गोलाकार रक्तचंदनाची ९ लाकडी ओडके दिसून आली. सदरचे लाकूड हे रक्तचंदन आहे, या बाबत खात्री करण्यासाठी वन परिमंडळ अधिकारी लोणी काळभोर मंगेश विठ्ठल सपकाळे व वनरक्षक पुणे मनोज संजय पारखे यांना बोलावून त्यांनी टेम्पोमध्ये मिळून आलेल्या लाकडांची पाहणी करून सदर लाकडी ओडके हे रक्तचंदन असल्याचे सांगितले.
पिकअपचालक साबळे यांच्याकडे रक्तचंदन हे कोठून आले व कोठे घेऊन चालला? याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे रक्तचंदन हे ॲलेन वाघमारे याच्या सांगण्यावरून कोंढवा येथून घेऊन लोणी काळभोर टोलनाक्याचे पुढे एका व्यापाऱ्यास विक्री करण्यास सांगितले असल्याचे सांगितलेे. पथकाने २७ लाख ५० हजार रुपये किमतीचे २७० किलो रक्तचंदनाचे ९ लाकडी ओंडके, पिकअप व एक मोबाईल असा एकूण ३२ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन जणांवर भारतीय वन अधिनियम व महाराष्ट्र वन नियमावली कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.