पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून तरुण - तरुणीला ३२ लाखांना गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: August 21, 2023 03:46 PM2023-08-21T15:46:56+5:302023-08-21T15:47:31+5:30
तरुणीचे १३ लाख तर तरुणाचे १८ लाख लुटले
पुणे : पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची आणि एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पहिल्या घटनेमध्ये विश्रांतवडी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षाच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणीला पार्ट टाइम नोकरी करण्यास इच्छुक आहेत का? असा मेसेज आला. तरुणीने होकार दिल्यावर वेगवगेळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुढील टास्क साठी पैसे भरण्यास सांगितले. मात्र पैसे भरल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही म्हणून तरुणीची एकूण १३ लाख २७ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ढवळे पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये मगरपट्टा सिटी परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींना पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर एकूण १८ लाख ७० हजार २०० रुपये भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.