स्वेटर खरेदीत पालिकेचे ३२ लाखांचे नुकसान
By admin | Published: December 12, 2015 12:48 AM2015-12-12T00:48:47+5:302015-12-12T00:48:47+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ५० हजार विद्यार्थ्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने स्वेटर खरेदी करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ५० हजार विद्यार्थ्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने स्वेटर खरेदी करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या ३०० ते ३५० रुपयांच्या स्वेटरची ३९० ते ४५० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण मंडळाकडून यापूर्वीही वही, कंपासपेटी, फर्निचर यांची चढ्या भावाने खरेदी झाल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिक्षण मंडळाकडून स्वेटरची चढ्या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या १ ली ते ७ वीमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून स्वेटर देण्यात येत आहे, यासाठी शिक्षण मंडळाने आॅक्टोबर २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली.
शिक्षण मंडळाने आॅर्डर दिलेल्या स्वेटरचे दर व प्रत्यक्षात बाजारामध्ये असलेले स्वेटरचे दर याची माहिती सजग नागरिक मंचने गोळा केली. वेगवेगळ््या साइजनुसार ३९० ते ४४४ रुपयांनी स्वेटरची खरेदी करण्यात आली आहे, प्रत्यक्षात बाजारामध्ये तेच स्वेटर २९० ते ३७५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शंभर स्वेटरची खरेदी केली तरी या किमतीला स्वेटर देण्यास ठेकेदार तयार आहेत, मात्र शिक्षण मंडळाने ५० हजार स्वेटरची खरेदी करूनही त्यांना इतक्या चढ्या दराने स्वेटर कसे देण्यात आले, असा प्रश्न सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. या खरेदीमध्ये महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खरेदीसाठी टेंडर काढताना बेसिक रेट जाहीर करणे आवश्यक होते, असे विश्वास सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
स्वेटर खरेदीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये ९ जणांनी सहभाग घेतला होता, त्यानुसार सर्वात कमी दर देणाऱ्या ठेकेदाराला खरेदीची आॅर्डर देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेनेच नियमानुसार ही प्रक्रिया राबविली आहे. यापेक्षा कमी दरामध्ये कोणी स्वेटर शिक्षण मंडळाला देऊ शकत होते तर त्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे होते.
- वासंती काकडे,
अध्यक्ष, शिक्षण मंडळ