दरमहा उत्पन्न, परदेशी सहलीचे आमिष दाखवून ३२ जणांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:06+5:302021-08-01T04:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेलिग्रो इंटरनॅशनल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक व थेट विक्री केल्यास, तसेच ‘पिरॅमिड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेलिग्रो इंटरनॅशनल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक व थेट विक्री केल्यास, तसेच ‘पिरॅमिड स्ट्रक्चर’प्रमाणे विक्रेत्यांचे जाळे निर्माण केल्यास दरमहा उत्पन्न, परतावा व परदेशी सहलीचे आमिष दाखवून ३२ जणांची ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. ‘एमपीआयडी’ कोर्टाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला.
दिलीप शंकर कुलकर्णी (वय ६५) आणि स्नेहदीप दिलीप कुलकर्णी (वय ३३, दोघेही रा. सौरभ गार्डन, सनसिटी रस्ता, आनंदनगर) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भानुदास सखाराम शिंदे (वय ५२, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ कालावधीत सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथे ही घटना घडली होती.
आरोपींना १४ जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी विरोध केला. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला असून, गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा व भेटवस्तूंचे आमिष दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या व फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. अर्जदार आरोपींना जामिनावर सोडल्यास फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असून, तपासामध्ये अडथळा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली. कोर्टाने ती मान्य केली.
.....
गुंतवणुकीच्या रकमेतून खरेदी केल्या चारचाकी
आरोपींनी गुंतवणूकदारांना बक्षीसाचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या रकमेतून चारचाकी वाहने खरेदी केली आहेत, तसेच अधिकाधिक गुंतवणूक करून घेण्याच्या हेतूने टीव्ही संच व अन्य भेटवस्तू दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत तपास केला जाणार असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.
.......