माऊली मंदिरात ३३ दिवस अखंड हरिपाठ कीर्तन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:33+5:302021-07-11T04:08:33+5:30
आळंदी : श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यानंतर अलंकापुरीत अव्याहतपणे कीर्तनाची सेवा सुरू आहे. माऊलींच्या वीणा मंदिरात सलग ३३ ...
आळंदी : श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यानंतर अलंकापुरीत अव्याहतपणे कीर्तनाची सेवा सुरू आहे. माऊलींच्या वीणा मंदिरात सलग ३३ दिवस परंपरेप्रमाणे चक्रांकित महाराज हे वैष्णव हरिपाठ कीर्तन रुपी सेवा करत आहेत. सुमारे दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा अखंडित आजही सुरू आहे. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित श्रोत्यांच्या उपस्थितीत ही परंपरा जोपासली जात आहे.
माऊलींच्या आषाढी वारीसाठी पालखीचे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातून प्रस्थान झाल्यानंतर माऊलींची प्रथम पूजा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थान येथे पालखी पलंगावर ठेवून श्री चक्रांकित महाराजांच्या हस्ते होते. येथील पूजेपूर्वी ती अन्यत्र कोठेही जमिनींवर ठेवली जात नाही. चक्रांकित महाराजांच्या पूजेनंतर काहीसा विसावा घेऊन पालखी सोहळा आपल्या आजोळी विसावली जातो.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे माऊलींचे मंदिर बंद असल्याने पालखीऐवजी माऊलींच्या चलपादुकांचे मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून प्रस्थान करण्यात आले आहे.
दर वर्षी पहिला दिवसाचा (आजोळी) मुक्काम झाल्यानंतर माऊली पंढरीकडे रवाना होतात. परंतु यंदा प्रस्थानानंतर माऊली सतरा दिवसांसाठी आळंदीतच आपल्या आजोळी मुक्कामी आहेत.
श्री माऊलींचे पंढरपूरसाठी प्रस्थान झाल्यानंतर चोपदार वीणा मंडपात येऊन श्री चक्रांकित महाराज यांना श्री माऊलींच्या आगमनाची वर्दी देतात. वीणा मंदिरात चक्रांकित महाराजांचे वंशज दररोज कीर्तनरुपी सेवा माऊलींना समर्पित करत आहेत. पंढरीचा आषाढी सोहळा पार पाडून माऊली पुन्हा मुख्य मंदिरात परतेपर्यंत दररोज सायंकाळी चक्रांकित महाराजांचे वंशज नित्यनियमाने सेवा करत आहेत. यंदा अवधूत विष्णू महाराज चक्रांकित, जगदीश महाराज जोशी, हरी चक्रांकित, चंद्रांशु चक्रांकित हे मंदिरात कीर्तन करत आहेत. या कीर्तन सेवेची सांगता श्रावण शुद्ध प्रतिपदेला काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
आषाढी वारीहून माऊलींचे अलंकापुरीत आगमन होण्यापूर्वी चोपदार चक्रांकित महाराजांना माऊलींच्या आगमनाचा वर्दी देण्यासाठी घरी येतात. त्यानंतर संपूर्ण शहरात माऊली परतल्याची वर्दी दिली जाते. वर्दीनंतर आळंदीतून चक्रांकित महाराज सोबत त्यांची दिंडी घेऊन माऊलींच्या परतीच्या सोहळ्याला सामोरे जातात. अलंकापुरीच्या सीमेवर आरती घेऊन माऊली मंदिरात प्रवेश करतात. यानंतर नरसिंह सरस्वती स्वामीमहाराज मूळ पीठ देवस्थान यांच्या तर्फे सर्व वारकरी तसेच भाविकांना पिठलं - भाकरीचा महाप्रसाद देण्यात येतो. ही परंपरा देखील गेली १५० वर्षांपूर्वीची अखंडितपणे सुरू आहे.
१० आळंदी
माउलींच्या वीणा मंडपात कीर्तन सेवा करताना चक्रांकित महाराज.