'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:02 PM2018-05-15T21:02:31+5:302018-05-15T21:06:30+5:30
माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे.
पुणे (अवसरी) :माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. या दरोड्यात माहेरवाशीण असलेल्या रुपाली काळे यांना डोके दाबून, धमकावून तब्बल ३३ तोळे सोन आणि १० हजार रुपये रोख असा सुमारे सात लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे .
अवसरी बुद्रुक येथे संभाजी हिंगे कुटुंबियांसह राहतात. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे त्यांचे वडील रामदास हे घराच्या ओट्यावर तर स्वतः संभाजी पत्नी सुनीता आणि मुलगा हर्षवर्धनसह गच्चीवर झोपले होते. घरात फक्त त्यांची विवाहित बहिण रुपाली काळे या झोपल्या होत्या. अचानक रात्री दीडच्या सुमारास काही दरोडेखोर पहारीच्या सहाय्याने मागील घराचा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटुन, घरात शिरून वस्तूंची उचकपाचक करत होते. त्यावेळी जाग आलेल्या रुपाली यांना बघताच त्यांनी त्यांचे पाय दाबून, डोके पकडून मारहाण केली. त्यांना गप्प बस अशी धमकीही दिली. हा सर्व प्रकार सुरु असताना प्रतिकार करत रुपाली ओरडल्या आणि भाऊ संभाजी यांना जाग आली. एवढ्या रात्री काय झाले हे बघण्यासाठी ते घरात आले असता गच्चीवरून त्यांना एक लाल शर्ट घातलेला इसम पळताना अंधारात दिसला.
घरात जाऊन बघितले असते संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. यावेळी घरातील चोरटयांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी संपूर्ण घर धुवून नेले होते . रूपाली यांचे १० दहा तोळे सोन्याची पट्टी असलेले २ लाख ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपये किमतीचे तीन तोळयाचा राणी हार,२५ हजार किमतीचे एक तोळयाचा मोठा मणी, १ लाख १२ हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्याचे नेकलेस,२५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी ,७५ हजार रुपये तीन तोळयाच्या सोन्याच्या बांगड्या,२५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची कर्णफुले,सुनीता हिंगे यांच्या तीन तोळयाचे मणी मंगळसूत्र ,३ तोळ्याचे नेकलेस ,संभाजी हिंगे यांची अंगठी १५ हजार रूपयांची ,७ हजार रूपयांची रोख रोकड,२२ हजार ५०० रूपयांची सोन्याची चैन,रामदास हिंगे यांच्या खिशातील १५०० रूपयांचे रोकड असा एकुण ७ लाख ३२ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे संभाजी हिंगे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे.