गुटखा विक्रीच्या कारवाईसाठी गुन्हे शाखेची 33 पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:42+5:302020-12-05T04:14:42+5:30
पुणे : शहरातील बेकायदा गुटखा विक्रीची पाळेमुळे खणून काढण्याकरिता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. ...
पुणे : शहरातील बेकायदा गुटखा विक्रीची पाळेमुळे खणून काढण्याकरिता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. गुटखा विक्रीवर कारवाईसाठी पोलिसांनी ३३ पथके तयार केली आहेत. त्याप्रमाणे शहरात अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणा-या 29 जणांवर पोलीसांकडून कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 12 लाख 26 हजार 463 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हडपसर, कोंढवा, वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ, कोथरुड, वारजे,उत्तमनगर या पोलीस स्टेशनच्या हददीतील अवैधरित्या गुटखा विक्री व वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हददीत छापे टाकून 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू मिश्रण युक्त तंबाखू, खर्रा, मावा इत्यादी प्रकारच्या गुटखा पदार्थांची कोणत्याही स्वरुपात निर्मिती, साठवण आणि वाहतुकीस प्रतिंबध घालण्यात आला आहे. त्यामुळे शहरात बाहेरगावाहून येणा-या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात पोलिसांनी गुटखा विक्री प्रकरणात १२ ठिकाणी कारवाई करून १८ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत पोलिसांनी २२ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. दरम्यान, गुटखा विक्रीतील पैसे हवाला व्यवहाराद्वारे पाठविणा-या नऊ जणांना गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करून तीन कोटी ४७ लाख ३८ हजारांची रोकड जप्त केली होती. या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली.
-----------------------------