बायकोकडून होतोय छळ, कोरोना काळात ३३२ तक्रारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:57+5:302021-07-25T04:08:57+5:30
पुणे : महिलांना सासरी छळ होत असल्याच्या तक्रारी नेहमीच असतात. मात्र, काळ बदलला तसा आता पुरुषांचा बायकोकडून छळ होतोय, ...
पुणे : महिलांना सासरी छळ होत असल्याच्या तक्रारी नेहमीच असतात. मात्र, काळ बदलला तसा आता पुरुषांचा बायकोकडून छळ होतोय, अशा तक्रार येऊ लागल्या आहेत. कोरोना काळात अधिक काळ एकत्र राहिल्याने पती-पत्नीमधील कुरबुरी वाढल्या. त्यानंतर पतीकडून पत्नीविषयी तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे.
यंदा जानेवारीपासून जूनअखेरपर्यंत ३३२ पुरुषांनी पत्नींकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पुणे शहर पोलीस दलातील भरोसा सेलकडे केल्या आहेत.
मानसिक छळच अधिक
महिलांकडून त्रास होत असलेल्या पुरुषांच्या तक्रारीमध्ये प्रामुख्याने पत्नीच्या माहेरचा त्यांच्या संसारात प्रमाणापेक्षा अधिक हस्तक्षेप असल्याचे दिसून येत आहे. आपल्या आईने सांगितल्यानुसारच झाले पाहिजे, अशी अपेक्षा पत्नीकडून होत आहे. त्याचा मानसिक त्रास अधिक होत असल्याचे या तक्रारीमध्ये केला जात असल्याचे दिसते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे अनेक पती-पत्नी घरात २४ तास एकत्र राहू लागले. यापूर्वी त्यांचा कमीत कमी सहवास असल्याने अनेक गोष्टींकडे परस्परांचे दुर्लक्ष होत होते. पण अधिक काळ एकत्र राहिल्याने व इतरांशी संपर्क कमी झाल्याने त्यांना एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टीतही उणिवा जाणवू लागल्या. त्यातून खटके उडू लागले. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल होताच गेल्या ऑक्टोबर २०२० मध्ये पुरुषांकडून भरोसा सेलकडे २२४ आणि नोव्हेंबर २०२० मध्ये २३४ तक्रारी आल्या. याच काळात महिलांकडून आलेल्या तक्रारी ६७ आणि ७७ इतक्या कमी होत्या. गेल्या वर्षभरात पुरुषांकडून ७९१ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी या दोन महिन्यांत ५७ टक्के तक्रारी आल्या होत्या.
विवाहबाह्य अनैतिक संबंधाचा संशय
पती-पत्नीच्या नात्यात विवाहबाह्य अनैतिक संबंधाचा संशय हे तक्रारीचे दुसरे मोठे कारण असते. पतीचे बाहेर काहीतरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पत्नीकडून घेतला जातो. त्यातून मग बाहेर असले की सातत्याने विचारणा, बरोबर कोण आहे, कोठे आहात, अशा विचारणा केल्याने अनेकांमध्ये दुरावा निर्माण होतो.
...
सततच्या तुलनेचा होतोय त्रास
माझी पत्नी सतत माहेर आणि सासरची तुलना करीत सासरच्या लोकांना नावे ठेवत असते. तिला सासरकडील कोणाची कोणतीही गोष्ट कधी पटत नाही. तिचे आईवडीलही सातत्याने तिच्याकडे चौकशीच्या नावाखाली काही-बाही सांगत असतात. माझ्या माहेरचे पहा कसे करतात, अशा तिच्या सततच्या टोमण्याने जीव हैराण झाला आहे.
-पत्नी पीडित पती
---
पुरुषांकडून आलेल्या तक्रारी
२०२० - ७९१
जून २०२१ - ३३२