पुण्यातून ३३८ मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:25+5:302021-02-25T04:13:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मित्राने लग्नाचे आमिष दाखविले, चांगल्या कामाचे आमिष दाखविले, वडिलांकडून मारहाण, घरात कोणी समजून घेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राने लग्नाचे आमिष दाखविले, चांगल्या कामाचे आमिष दाखविले, वडिलांकडून मारहाण, घरात कोणी समजून घेत नाही, अशा विविध कारणामुळे घरातून मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात पुणे शहरातून तब्बल ३३८ मुली घरातून निघून गेल्या.
वयात आलेल्या मुलींच्या सुरक्षेच्या काळजीने आईवडिल तिच्यावर काही बंधने घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावरुन घरात छोटेमोठे खटके उडतात. घरात आपले कोणी ऐकत नाही, असा समज करुन घेऊन मुली अनेकदा बाहेरच्यांच्या बोलण्याला भुलतात. त्यातून आतापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्याच्या अपेक्षेने अनेक मुली घर सोडून पळून जातात. काही वेळेला प्रेमसंबंधांना घरातून परवानगी मिळणार नाही असे वाटल्याने अनेक मुली घरातून प्रियकराबरोबर पळून जातात. अशा पळून गेलेल्या मुलामुलींचा शोध प्रामुख्याने स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत केला जातो.
मुलींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागामार्फत सहाय्य केले जाते. पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके व त्यांचे सहकारी तांत्रिक मदत पुरवितात.
गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊनमुळे सर्व जण घरात असल्याचे मुलींचे पळून जाण्याचे प्रकार काही प्रमाणात कमी झाले. तसेच संपूर्ण पोलीस दल बंदोबस्तात अडकून पडले होते. तसेच मुलींच्या शोधासाठी शहराबाहेर तपासासाठी पोलिसांना पाठविण्यात अडचणी होत्या. त्यामुळे मुलींचा शोध लागण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
अनेकदा मुली घरातून पळून गेल्यानंतर त्या काही दिवसांनी, महिन्यांनी परत येतात. तसेच या मुली काही दिवसांनी आपली खुशाली घरी कळवितात. आपण कोठे आहोत, याची माहिती देतात. पण मुलगी पळून गेली. तिने आपल्या घराण्याला बट्टा लावला, असे मानून आई वडिल ही माहिती पोलिसांना देत नाही. त्यामुळे बेपत्ता मुलींचा आकडा मोठा राहतो.
............
वर्ष बेपत्ता मुली सापडलेल्या मुली
२०२० ३३८ ७१
२०१९ ४६३ १५६
२०१८ ४३० १५९