कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३४ गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:13 AM2021-09-19T04:13:12+5:302021-09-19T04:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत पोलिासांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत पोलिासांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. मध्यरात्री अचानक कारवाई करून पोलिसांनी वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असलेल्या १६६८ गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी केली. या वेळी ४२४ गुन्हेगार घरात वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
झाडाझडतीच्या वेळी पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या १५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १३ कोयते, तलवार, पालघन अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली, तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन गुन्हेगारांना अटक केली.
तपासणी मोहिमेत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला अटक करण्यात आली. मेहराज अन्वर शेख असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. अमली पदार्थ तसेच बेकायदा गावठी दारूविक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. शहरातील ५२५ हॉटेल आणि लॉजची तपासणी करण्यात आली. ७ तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून अवैध रिक्षा व ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, पंकज देशमुख, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे आदी या कारवाईत सहभागी झाले होते.