बंड गार्डनवरून ३४ हजार क्यूसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:17 PM2018-08-23T21:17:06+5:302018-08-23T21:18:04+5:30
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणासह पानशेत,वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणासह पानशेत,वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यामुळे बंडगार्डन येथील बंधा-यापासून ३४ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गुरूवारी पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारपासून विसर्ग कमी केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात विदर्भ ,मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे.पुणे जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.परिणामी जिल्हातील बहुतेक धरणे ९० ते १०० टक्के भरली आहेत.त्यामुळे धरणांमधून विसर्ग सोडविण्यात आला आहे.खडवासला धरणातून १५ हजार १२९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मुठानदी दुथडी भरून वाहत आहे.मात्र,पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे.
गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत खडवासला धरणात २ मि.मी.,पानशेतमध्ये ८ मि.मी.,वरसगावमध्ये ९ मि.मी.तर टेमघरमध्ये २९ मि.मी.पावसाची नोंद झाली.मंगळवारी व बुधवारी धरणामध्ये चांगला पाऊस सुरू होता.गुरूवारी दिवसभर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली,असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
जिल्हयातील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग
धरणाचे नाव सुरू असलेला विसर्ग
खडकवासला १५,१२९
पानशेत ३,९०८
वरसगाव ६,०७७
मुळशी १०,१६०
कासरसाई ४५१
आंध्रा ५१६
वडीवळे १,३७६
भामा आसखेड २,१९८
चासकमान ३,६१५
----------------------------------