पुण्याच्या मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना जेवणातून विषबाधा; काहींची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:58 PM2021-11-19T15:58:03+5:302021-11-19T15:59:55+5:30
पाण्याची टाकी साफ न केल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे
पवनानगर : मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी काकडा आरती समाप्तीचा काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. त्यातून ३५ ते ४५ नागरीकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला असून बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णालयातील तीनही वार्ड फुल झाले असुन काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ वर्षा पाटील,डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ पोपट आधाते, डॉ शिवराज वाघमारे रुग्णांचे उपचार करत आहे.या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलिस व वडगाव मावळचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
''सकाळी अचानक आम्हाला भडवली गावातून फोन आला की, अन्नातून नागरिकांना विष बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी अब्युलन्सद्वारे रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशा प्रकारची लक्षणे दिसुन आली आहेत. साधारणतः रुग्णालयात २८ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५ ते ६ पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले आहे डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले आहे.''
खराब पाण्यामुळे विषबाधा झाली
लाँकडाऊन पासून बंद असलेल्या टाकीमध्ये स्वच्छ न करता तसेच पाणी भरल्याने विषबाधा झाली आहे. मंदिराजवळ असलेल्या अंगणवाडी शाळेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी लाँकडाऊन पासून ग्रामपंचायत ने स्वच्छ केली नाही. त्यामधील खराब पाणी बाहेर न काढता काल त्याच टाकीमध्ये ग्रामपंचायतीने पाणी सोडले. पाणी स्वयंपाक करण्यासाठी घेतले. त्यामुळे खराब पाण्यामुळे विषबाधा झाली आहे.