गाईच्या ३५, तर म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर दर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:46+5:302021-08-27T04:13:46+5:30
बारामती: गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर यासह अनेक मागण्यांसाठी ‘लेटर टू ...
बारामती: गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर यासह अनेक मागण्यांसाठी ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ अभियानांतर्गत निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना बुधवारी (दि. २५) पत्र लिहिले आहे.
सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे म्हणाले की, शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळत नाही. चोहोबाजूंनी दुग्धउत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करणारी व्यवस्था उभी आहे. त्यामुळे या शोषणकारी प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने पाठविलेल्या पत्रामध्ये, गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर मिळावा. लॉकडाऊन काळात दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने दूध घेतले. शेतकऱ्यांना यामुळे खूप नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळावे. दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करण्यात यावा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभूत दरासाठी एफआरपी आणि प्रक्रिया व विक्री प्रक्रियेतील उत्पन्नात हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर संरक्षण लागू करण्यात यावे. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य-एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारण्यात यावे. भेसळविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्यावी. सदोष मिल्को मीटर वापरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणे थांबावे यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्को मीटर वापरणे बंधनकारक करा व मिल्को मीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करा. शासकीय अनुदानातून पशू विमा योजना सुरू करा, अशा मागण्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संपत चांदणे, राजू भोंग, विक्रम जगताप, मंगेश घाडगे, सुमित बोराटे, तात्यासो आदलिंग, धोंडीराम किरकत, राजेंद्र गायकवाड, दादाराम बारावकर आदी उपस्थित होते.
२६०८२०२१-बारामती-०५