आगीत ३५ घरे जळून खाक
By admin | Published: April 26, 2017 04:12 AM2017-04-26T04:12:16+5:302017-04-26T04:12:16+5:30
पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळेमागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने
पुणे : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळेमागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने, लाकडाचे गोडाऊन आणि ३५ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेनंतर सिलेंडरचे दोन स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळेमागील बाजूस छोटी वस्ती आहे. घरांना पहाटे अचानक आग लागली. आजूबाजूला लाकडाची गोडाऊन आहेत. तसेच वेफर्स तयार करण्याचे कारखाने आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे १५ बंब घटनास्थळी रवाना झाले. मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, सुनील गिलबिले, विजय भिलारे, गजानन पाथ्रुडकर, प्रकाश गोरे यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेफर्सच्या कारखान्यातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. या परिसरात चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे मदत कार्यालयात अडथळा येत होता. आग पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी दुपारपर्यंत प्रयत्न सुरू होते. आगीच घरं आणि गोदामाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. (प्रतिनिधी)