पालिकेकडून प्रतिविद्यार्थी ३५ हजार खर्च
By admin | Published: December 22, 2015 01:37 AM2015-12-22T01:37:25+5:302015-12-22T01:37:25+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी स्थायी समितीने तब्बल ३४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी स्थायी समितीने तब्बल ३४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. महापालिकेकडून एका विद्यार्थ्यांवर तब्बल ३५ हजार रुपयांचा खर्च केला जात असताना शिक्षण मंडळाच्या शाळांची व शिक्षकांची गुणवत्ता कधी सुधारणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरातील उद्याचे उज्ज्वल भवितव्य असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळून त्यांनी यशाची शिखरे गाठावीत, याकरिता महापालिकेच्या वतीने त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्वेटर मोफत दिले जाते. त्याचबरोबर ई-लर्निंग, संगणक साक्षरता, क्रीडानिकेतन अशा उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दर वर्षी केली जाते. मात्र, त्यातुलनेत शिक्षण मंडळाच्या शाळेच्या गुणवत्तेत वाढ होताना दिसून येत नाही.
आयुक्त कुणाल कुमार यांनी आगामी वर्षापासून गुणवत्तावाढीसाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, मॉडेल स्कूल म्हणून १७ शाळा विकसित केल्या जाणार आहेत. याच्या अंमलबजावणीनंतर तरी गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थायी समिती अध्यक्ष आश्विनी कदम म्हणाल्या, ‘‘गुणवत्तावाढीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण मंडळाला भरीव तरतूद स्थायी समितीने उपलब्ध करून दिली आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना निराशा पदरी पडू नये.’’