हिंजवडीतून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर; ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 03:33 PM2024-06-07T15:33:39+5:302024-06-07T15:34:05+5:30
संबंधित कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू, कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ‘काॅन्फीडन्स’ देऊ
बारामती : महाराष्ट्राच्या चुकीच्या धोरणांमुळे हिंजवडीतील साॅफ्टवेअर कंपन्या जात आहेत. हिंजवडी ओस पडु लागली आहे. राज्यातील ट्रीपल इंजिन सरकार यासाठी जबाबदार असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. बारामती येथे पत्रकारांशी बाोलताना सुळे यांनी हा आरोप केला.
यावेळी सुळे पुढे म्हणाल्या,‘पवारसाहेब’ यांना पुढील आठवड्यात मोठी मिटींग घेण्यासाठी वेळ मागितली आहे. यावेळी राज्य आणि विशेषत: पुण्यातील सगळ्या साॅफ्टवेअर कंपन्यांची आणि मराठा चेंबरची बैठक लावण्याची गरज आहे. ३५ ते ४० कंपन्या हिंजवडीतून बाहेर चालल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणले. त्यामध्ये ६ लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या. गेली २५ ते ३० वर्ष त्या कंपन्या उत्तम सुरु होत्या. मात्र, दुर्दैवाने त्या कंपन्या सोडुन चालल्या आहेत. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार मराठा चेंबर आॅफ काॅमर्स समवेत संबंधितांची बैठक घेणार आहे. पुण्यासाठी जम्बो मिटींग लावण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभ राहू. कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ‘काॅन्फीडन्स’देणे आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. याबाबत पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक देखील पार पडली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासह विविध विषयांसाठी आम्हाला विधानसभा निवडणुक महत्वाची असल्याचे सुळे यांनी नमुद केले. एक्सिट पोलच्या नावाखाली झालेल्या मार्केट घोटाळ्याची दबक्या अवाजात चर्चा आहे. याची चाैकशी करण्याची मागणी होत असल्यास सरकाने ती करावी,असे सुळे म्हणाल्या. अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात प्रवेश करीत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे यांनी माझे पोट खुप मोठे आहे, माझ्या पोटात खुप गोष्टी राहतात,असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले. शेतकरी हमीभाव मिळवुन देणे माझ्यासाठी सर्वात मोठा विषय आहे. दुष्काळ कमी करण्यासाठी, हवामान बदल आणि प्रदुषणावरील उपाययोजनांबाबत पाॅलीसी लेवल ला केंद्र पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघावरुन का हटविले,हा मोठा प्रश्न आहे. हा विषय नेमका काय आहे ते समजून घेणार आहे. युगेंद्र पवार कुस्ती क्षेत्रात चांगल काम करीत आहेत. त्याची माहिती घ्यावीच लागणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी काळात आमचा पक्ष विधानसभा निवडणुकीपासुन सहकारी सोसायटी, सहकारी बॅंका,सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती, जिल्हा परीषद, नगरपरीषद, महानगरपालीकांसह सर्वच निवडणुक लढविणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांंनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांना पुढील प्रत्येक निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत सुळे यांनी यावेळी दिले.