३५० वीज चोरांवर भाटनगरात कारवाई
By admin | Published: November 4, 2014 04:07 AM2014-11-04T04:07:06+5:302014-11-04T04:07:06+5:30
अनधिकृतपणे आकडे टाकून वीज वापरणाऱ्या ३५० जणांवर महावितरणने सोमवारी कारवाई केली. कारवाईत केवळ वीजजोडाच्या वायर जप्त करण्याची कारवाई झाली
पिंपरी : अनधिकृतपणे आकडे टाकून वीज वापरणाऱ्या ३५० जणांवर महावितरणने सोमवारी कारवाई केली. कारवाईत केवळ वीजजोडाच्या वायर जप्त करण्याची कारवाई झाली असल्याचे विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
महावितरणच्या पिंपरी विभागांतर्गत खराळवाडी उपविभागाच्या अखत्यारित ही कारवाई झाली. या उपविभागाच्या नियंत्रणात झुलेलाल कॉम्प्लेक्सजवळच ३५० केव्ही क्षमतेचे विद्युतरोहित्र आहे. त्यामधून वीजपुरवठा होणाऱ्या लघुदाब वाहिनीला आकडे जोडून वीजचोरी होत असल्याची बाब महावितरणच्या निदर्शनास आली. त्यानुसार पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र खडक्कर, एम. आर. साळुंके, सहाय्यक अभियंता एस. एस. सुर्वे, एन. के. जनार्दन यांच्यासह २२ तारतंत्री कर्मचाऱ्यांच्या पथकाने सकाळी ११ पासून कारवाई सुरू केली.
कारवाई सुरू होताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे आकडे टाकून वीज वापरणारांची माहिती स्पष्ट होऊ शकली
नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात
कारवाई होत असताना एकही वीजचोरी करणारा सापडला नसल्याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)