नागरवस्तीतील ३५० जणी पालिकेच्या लाडक्या लेकी

By admin | Published: September 22, 2015 03:26 AM2015-09-22T03:26:22+5:302015-09-22T03:26:22+5:30

महापालिकेच्या लाडकी लेक योजनेचा ३५० जणींना लाभ झाला आहे. या प्रत्येकीला आता तिच्या वयाच्या १८व्या वर्षी किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील

350 people of the town | नागरवस्तीतील ३५० जणी पालिकेच्या लाडक्या लेकी

नागरवस्तीतील ३५० जणी पालिकेच्या लाडक्या लेकी

Next

पुणे : महापालिकेच्या लाडकी लेक योजनेचा ३५० जणींना लाभ झाला आहे. या प्रत्येकीला आता तिच्या वयाच्या १८व्या वर्षी किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील. नागरवस्ती विकास योजनेतंर्गत सुरू झालेल्या या योजनेला आणखी प्रतिसाद मिळावा, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.
स्त्री जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर उपाय म्हणून महापालिकेने सन २०१३ मध्ये ही योजना सुरू केली. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशी कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांच्या घरात एप्रिल २०१३ नंतर जन्म झालेल्या मुलीसाठी ही योजना आहे. ही मुलगी पहिली, दुसरी किंवा भावाच्या पाठीवर जन्म झालेली असावी. (तिसरी नको) तिच्या नावे तिच्या परिसरातील लोकांनी, तिच्या नातेवाइकांनी किंवा ते शक्य नसेल तर तिच्या पालकांनी १० हजार रुपये जमा करायचे. १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याच्या तहसीलदाराच्या दाखल्यासह हे १० हजार रुपये महापालिकेत जमा करायचे. त्यानंतर महापालिका स्वत:चे २० हजार रुपये त्यात जमा करून एकूण ३० हजार रुपये त्या मुलीच्या नावावर बँकेत जमा करते. त्या मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील.
महापालिकेत या योजनेतील अर्जाचा तसेच बँकेसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी नागरवस्ती विकास योजनेचे प्रमुख हनुमंत नाझीरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी लेखा कळसकर व अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती आहे. ज्या मुलीच्या नावे ठेव ठेवली असेल, तिच्या पालकांना ती मुलगी सज्ञान होईपर्यंत ही रक्कम काढता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. नियम, अटी निश्चित झाल्यानंतर सन २०१४ मध्ये ही योजना सुरू झाली. पहिल्याच वर्षी ३५० कुुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या नावे पालिकेने एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली आहे. या वर्षीही या योजनेतंर्गत आतापर्यंतं १०० पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे.

Web Title: 350 people of the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.