सिंहगडाच्या "त्या" थरारक लढाईला आज झाली 350 वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 04:30 PM2020-02-04T16:30:00+5:302020-02-04T16:30:02+5:30
आज पासून 350 वर्षापूर्वी सिंहगड्याची लढाई झाली हाेती. या लढाईत मराठ्यांनी सिंहगड स्वराज्यात आणला हाेता.
पुणे : माघ वद्य अष्टमीची ती भयाण रात्र हाेती. सर्वत्र अंधार पसरलेला हाेता. काेंढाण्यावर (आताचा सिंहगड) किल्लेदार उद्यभान राठाेड याच्याकडे सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. तर दुसरीकडे पाचशे मावळ्यांच्या फाैजेसह तानाजी मालुसरे सिंहगड जिंकण्यासाठी राजगडावरुन निघाले हाेते. आजपासून ठिक 350 वर्षापूर्वी 4 फेब्रुवारी 1670 राेजी काेंढाण्याची लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी मुघलांना कडवी झुंज देत काेंढाणा स्वराज्यात आणला हाेता. या लढाईत सेनापती तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. ''गड आला पण सिंह गेला'' अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा गाैरव केला हाेता.
पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले हाेते. त्यात काेंढाण्याचा देखील समावेश हाेता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. काेंढाणा हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी ''राजगड'' केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते. ''उदयभान राठोड'' हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.
काेंढाणा जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी ''तानाजी मालुसरे'' यांना दिली हाेती. जेव्हा त्यांना ही गाेष्ट समजली तेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न हाेते. शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत काेंढाणा सर करण्याचा विडा उचलला. ''आधी लगीन काेंढाण्याचे मग माझ्या रायबाचे'' हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत. काेंढाण्याची जबाबदारी मुघलांनी उदयभान राठाेड याच्याव साेपवली हाेती. त्याच्या हाताखाली सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.
द्राेणगिरीचा कडा चढून मराठ्यांचे सैन्य काेंढाण्यावर गेले. गडावर उदयभानाच्या सैन्याशी घमासान युद्ध झाले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता.