विवाहाच्या आमिषाने महिलेला ३५ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:22+5:302021-06-20T04:09:22+5:30
पुणे : एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केलेल्या महिलेला विवाहाच्या आमिषाने चोरट्याने ३५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
पुणे : एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केलेल्या महिलेला विवाहाच्या आमिषाने चोरट्याने ३५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेच्या वडिलांनी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून विवाहास इच्छुक असून, एका कंपनीत उच्चपदस्थ आधिकारी असल्याची बतावणी करण्यात आली होती. त्यानंतर दोघांमधील संवाद वाढला. दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या आईचा वाढदिवस होता. वाढदिवसासाठी भेटवस्तू पाठविणार असल्याची बतावणी त्याने केली होती. त्यानंतर भेटवस्तूंचे खोके दिल्लीत पाठविले असून, विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. सीमाशुल्क कर तातडीने भरल्यास भेटवस्तू मिळतील, असेही तिला सांगण्यात आले होते. महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने बँक खात्यात ३५ हजार ९९८ रुपये पाठविले. दरम्यान, भेटवस्तू मिळाल्या नाहीत. बतावणी करणाऱ्याचा मोबाइल क्रमांकही बंद असल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करत आहेत.
---