तौक्ते चक्रीवादळामुळे ३६ कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:53+5:302021-05-17T04:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून भोर, वेल्हा तालुक्यात वादळी वारे जोरदार वाहू लागल्याने नसरापूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून भोर, वेल्हा तालुक्यात वादळी वारे जोरदार वाहू लागल्याने नसरापूर व निधान येथील ३६ आदिवासी कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
वाऱ्यासह पाऊस येण्याच्या शक्यतेने भोर तालुक्यातील नसरापूरसह निधान येथील ३६ आदिवासी कातकरी कुटुंबातील ११० नागरिकांचे राहत्या कच्च्या घरातील वस्तीतून स्थलांतर, नसरापूर येथील ३२ कुटुंबांचे श्री शिवाजी विद्यालयात, तर निधान येथील ४ कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी करण्यात आले.
रविवारी दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळलीतील अशी स्थिती आहे. या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेले नाही, तरीही नसरापूर येथील मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली व तलाठी जालिंदर बरकडे यांनी त्यांना सुरक्षित ठिकाण हलविण्याचे दुपारपासून आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी येथील कातकरी वस्तीतील दोन छोट्या मुलींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्या धास्तीने कुटुंबांनी स्थलांतरासाठी प्रशासनाच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद दिला. या कुटुंबांना जोपर्यंत ही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास रहाणार आहेत तोपर्यंत त्यांच्या भोजनाची व्यवस्था नसरापूर ग्रामपंचायतीने केली आहे.
फोटो व ओळ : नसरापूर (ता.भोर) येथील आदिवासी कातकरी कुटुंबांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.