पुणे जिल्ह्यात तीन दिवसांत ३६ मिलिमीटर पाऊस, भात रोपवाटिकांचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 12:15 PM2024-06-08T12:15:19+5:302024-06-08T12:15:37+5:30
जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे....
पुणे : जिल्हाभरात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात सरासरी ३६ मिलिमीटर पाऊस झाला असून पश्चिम पट्ट्यात भात रोपवाटिका टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तर, पूर्व भागात मशागतीची कामे संपली आहेत. पुढील चार-पाच दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरिपाच्या पेरण्यांना वेग येईल. तसेच उडीद, मूग व बाजरी या महत्त्वाच्या पिकांखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३६ मीटर पाऊस झाला असून सर्वाधिक ७६ मिलिमीटर पाऊस इंदापूर तालुक्यात झाला आहे. त्या खालोखाल बारामतीमध्ये ६५ मिलिमीटर तर भोर तालुक्यात ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे जूनमधील एकूण सरासरी पावसाच्या २० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.या पावसामुळे पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या रोपवाटिकांचे काम सुरू करण्यात आले आहे. पाऊस वेळेत सुरू झाल्यामुळे पूर्व भागातही उडीद, मूग व बाजरी या महत्त्वाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे. मात्र, पुरेशी ओल अर्थात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला काचोळे यांनी दिला आहे. या पावसामुळे यंदा या तिन्ही पिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
हवेली ५०.२ मुळशी १७.७, भोर ४४.५, वडगाव मावळ १५, वेल्हे ३१.३, जुन्नर ८.६, राजगुरुनगर २२.२, आंबेगाव २६.४, शिरूर १७.९, बारामती ६५.१, इंदापूर ७६.३, दौंड ४३.२, पुरंदर २०.१ एकूण सरासरी ३६
खरिपाच्या पेरणीसाठी बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असून खतांचाही बफर स्टॉप करण्यात आला आहे. त्यामुळे बियाणे व खतांच्या संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही. खतांची अडचण निर्माण झाल्यास तीदेखील सोडवण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे