‘वनराई करंडक’ स्पर्धेत ३६ शाळांचा सहभाग; पुण्यातील शिक्षक भवन येथे प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:15 PM2018-01-06T13:15:54+5:302018-01-06T13:20:42+5:30
‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण अशा विषयांवर उपाय आणि जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत.
पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण अशा विषयांवर उपाय आणि जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला आहे. पुण्यातील शिक्षक भवन येथे करंडकाची प्राथमिक फेरी सुरु झाली. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा करंडकाचा मूळ उद्देश आहे.
प्राथमिक फेरीचे परिक्षण पुष्कर देशपांडे, सीमा पोंक्षे आणि पुजा पारखी हे करत आहेत. यावेळी वनराई ईको क्लब प्रकल्प संचालक भारत साबळे यांच्यासह अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते. वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दर वर्षी आयोजित केला जातो. स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ आणि ६ जानेवारी रोजी आहे तर अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १७ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया यांनी दिली.