Railway | ३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वेस्थानकावर थांबाव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 08:42 AM2023-03-16T08:42:32+5:302023-03-16T08:44:05+5:30
दौंड जंक्शन हे दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे...
पुणे : मुंबईसह पुण्यातून दक्षिण भारतात जाणाऱ्या व दक्षिण भारतातून मुंबई- पुण्याकडे येणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे दौंड रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वेस्थानकावरच जावे लागते. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली.
दौंड जंक्शन हे दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. या ठिकाणाहून दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस दौंड येथे थांबत नाहीत. साधारण ३६ रेल्वे गाड्यांना दौंड रेल्वेस्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या रेल्वेमध्ये बसण्यासाठी पुण्यामध्ये जावे लागते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्थानकावर थांबा देणे गरजेचे आहे, अशी विनंती सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.