३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:53 PM2021-03-31T20:53:24+5:302021-03-31T20:54:11+5:30

सासऱ्याचे मृत्युपत्र बनावट, ७ दिवस पोलीस कोठडी....

37 anonymous companies, anonymous assets worth Rs 82 crore; suspended Hanumant Nazirkar assets | ३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप

३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप

Next

पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचे कारनामे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात समोर आले आहेत.

सासर्‍याच्या नावाखाली त्याने ३७ कंपन्या स्थापन केल्या असून त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांची आतापर्यंतच्या तपासात ८२ कोटींची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर याला मंगळवारी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी नाझीरकरसह एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हनुमंत नाझीरकर, पत्नी संगिता नाझीरकर, मुलगी गितांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर(सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड), अनिल शंकर शिपकुले (रा. शिरवली, ता़ बारामती), बाळासाहेब विठ्ठल घनवट (रा. शिरवली, ता़ बारामती), अ‍ॅड़ विजयसिंह भगवान धुमाळ (वय ७४, रा. बारामती), राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल खोमणे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

उत्पन्नापेक्षा अधिक २ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी १८ जून २०२० रोजी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेल्या ७ -८ महिन्यात केलेल्या तपासात ज्ञात उत्पनापेक्षा ८२ कोटी ३४ लाख ३८ हजार ६८० रुपयांची जादा मालमत्ता नाझीरकर, तसेच त्याचे सासरे गुलाब धावडे, पत्नी संगिता, मुलगी गितांजली व मुलगा भास्कर यांच्या नावाने बाळगून असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही एकूण उत्पन्नाच्या ११६२ टक्के अधिक आहे. नाझीरकर याचे सासरे हे १९८७ मध्ये वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना पेन्शन ३०० रुपये होते. असे असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. तसेच ३७ भागीदारी तसेच खासगी कंपन्या स्थापन केल्या. नाझीरकर कुटुंबियांचे नावे ३७ भागीदारी तसेच खासगी कंपन्या आढळून आल्या. त्यातील गुंतवणूक व नफा वगळून ही बेकायदा मालमत्ता आढळून आली आहे. 

सासरे गुलाब धावडे यांचे निधन झाल्यानंतर नाझीरकर याने त्यांचे मृत्युपत्र तयार करुन ती सर्व मालमत्ता पत्नी संगिता नाझीरकर हिच्या नावे वर्ग केल्याचे आढळून आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हे मृत्युपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी दिले होते. हस्ताक्षर तज्ञांकडील अहवालावरुन हे मृत्युपत्र बनावट व खोटे असल्याचे निष्पन्न झाले. हनुमंत नाझीरकर याने एकाच क्रमांकाचे ३ बनावट नोटराईज मृत्युपत्र तयार केले असून त्यापैकी १ मुळ मृत्युपत्र जप्त करण्यात आले आहे. मृत्युपत्रावर नोटरी म्हणून सही व शिक्का असलेले नोटरी अ‍ॅड. विजय धुमाळ यांच्याकडे तपास करता त्यांनी नोटराईज मृत्युपत्रातील शिक्के व सह्या या त्यांच्या नसून बनावट असल्याचे तपासात सांगितले आहे. 

नाझीरकर याने त्याचे सासरे गुलाब धावडे व पत्नी संगिता यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी करताना, बँक व्यवहारात तसेच विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुक करताना कोट्यवधी रुपये रोख स्वरुपात गुंतविले आहेत. हवाला मार्गे पैश्यांचा वापर झाला अगर कसे याचा तपास करायचा आहे. 

नाझीरकर याने अवैध मार्गाने कमाविलेल्या पैश्यातून सासरे धावडे याचे नावाने ३५ स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. हनुमंत नाझीरकर व संगीता यांनी वैयक्तिकरित्या १७ स्थावर मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. अशा एकूण ५२ स्थावर मालमत्तांचे मुळे खरेदीखत आरोपीकडून हस्तगत करुन या मालमत्ता खरेदी करताना मोठ्या स्वरुपात रोख रक्कमेचा वापर झालेला आहे. 
नाझीरकर याने महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी स्वत: पेसे देऊन इतरांचे नावाने अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याचे तपासादरम्यान दिसून येत आहे. त्याचा अधिक तपास करायचा आहे. नाझीरकर कुटुंबियाचे नावे ३७ कंपन्या असल्याचे निष्पन्न झाले असून त्या सर्व कंपन्यांचे कामकाज व आर्थिक व्यवहार हे हनुमंत नाझीरकर हे स्वत: पाहत होते, असे सर्व कंपनीतील भागीदार यांचे म्हणणे आहे. नाझीरकर याला ५ वेळा तपासाकामी हजर राहण्याबाबत कळविले होते, तरीही त्याने तपासात सहकार्य केले नाही, असे सांगून सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पोलीस कोठडीची विनंती केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरुन नाझीरकर याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 37 anonymous companies, anonymous assets worth Rs 82 crore; suspended Hanumant Nazirkar assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.